कल्याण : कल्याण-डोंबिवलीतील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी शहाड उड्डाणपुलाचे चौपरीकरण, कल्याण पूर्व-पश्चिमेला जोडणारा ४०० कोटींचा एलिव्हेटेड पूल आणि नेवाळी नाक्यावरील उड्डाणपूल यांना गती देण्यासाठी कल्याणचे शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी त्यांनी सोमवारी एमएमआरडीए आयुक्तांसोबत मुंबईतील कार्यालयात बैठक घेतली.
केडीएमसीचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, शिवसेनेचे माजी नगरसेवक विश्वनाथ राणे, दीपेश म्हात्रे आणि राजेश मोरे आदी यावेळी उपस्थित होते. शिंदे म्हणाले, कल्याण-नगर मार्गाचे चौपदरीकरण केले जाणार आहे. या मार्गावरील वालधुनी पूल चौपदरी झाला आहे. शहाड येथील दुपदरी असलेल्या रेल्वे उड्डाणपुलाच्या चौपदरीकरणाची मागणी एमएमआरडीएकडे केली आहे. त्याचा डीपीआर तयार करण्याचे आदेश एमएमआरडीएने सूर्यवंशी यांना दिले आहेत. डीपीआर तयार झाल्यावर पुलासाठी किती खर्च होईल हे स्पष्ट होईल.
ते पुढे म्हणाले, कल्याण पूर्व-पश्चिमेला जोडणारा एलिव्हेटेड पूल हा पुणे लिंक रस्त्यावरून विठ्ठलवाडी येथून पश्चिमेतील भवानी चौकात उतरणार आहे. त्याचा डीपीआर तयार असून, रेल्वेकडून मंजुरी आवश्यक आहे. दुसरीकडे कल्याण-मलंग रस्त्याचे रुंदीकरण झाले आहे. हा रस्ता अंबरनाथ-शीळ रस्त्यास नेवाळी नाक्यावर मिळतो. नेवाळी नाक्यावरील कोंडी सोडवण्यासाठी तेथे उड्डाणपूल उभारण्याची मागणी केली आहे. त्याचाही डीपीआर लवकर तयार केला जाणार आहे.
दुर्गाडी ते टिटवाळा रिंगरोड प्रकल्प जेथे संपतो तेथून पुढे मुरबाड-गोवेली नाक्यावर रस्ता नेण्यासाठी डीपीआर तयार करण्याचीही मागणी केली आहे. मोठागाव ठाकुर्ली ते दुर्गाडी या रिंगरोडच्या तिसऱ्या टप्प्याची निविदा येत्या आठवड्यात निविदा काढली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तर, काटई ते मोठागाव ठाकुर्ली या टप्प्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया केडीएमसी आयुक्तांनी सुरू करावी, असे एमएमआरडीएने सूचित केले आहे, असे शिंदे यांनी सांगितले.
शहरांशी कनेक्टिव्हिटी वाढेल
सगळे प्रकल्प मार्गी लागल्यास कल्याण-डोंबिवलीतील वाहतूककोंडी सुटेल. पत्रीपूल, वडवली पूल आणि दुर्गाडी खाडी पुलाचे काम झाले आहे. मोठागाव ठाकुर्ली ते माणकोली खाडीपुलाचे काम प्रगतिपथावर आहे. तसेच रिंगरोड, शहाड उड्डाणपूल, कल्याणचा एलिव्हेटेट पूल आणि आणि नेवाळी उड्डाणपूल झाल्यास चहूबाजूंनी ठाणे, मुरबाड-नगर, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई आणि अंबरनाथ-बदलापूर शहरांशी कनेक्टिव्हिटी वाढेल, असा विश्वास खासदार शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
-----------