ठाणे : गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी यंदाचा रविवार हा शेवटचा सुटीचा दिवस असल्याने ठाणेकर बाहेर पडले होते. पावसाची सकाळपासून रिपरिप असतानाही खरेदी मात्र सुरू होती. कोरोनामुळे आर्थिक बजेट कोसळल्याने खरेदी करताना ठाणेकरांना हात आखडता घ्यावा लागत होता. अर्थातच गणेशोत्सवानिमित्त होणाऱ्या उलाढालीवर याचा परिणाम होणार आहे.
आपल्या लाडक्या गणरायाचे आगमन शुक्रवारी होत आहे. त्यामुळे सर्वत्र लगबग सुरू आहे. खरेदीसाठी शनिवार आणि रविवारचा मुहूर्त ठाणेकरांनी साधला. गेल्यावर्षी ऑनलाईन खरेदी करणारे ठाणेकर यावर्षी मात्र खरेदीसाठी बाहेर पडले. ठाण्यातील मुख्य बाजारपेठ म्हणून ओळख असलेले जांभळी मार्केट रविवारी गर्दीने फुलले होते. पावसातही ठाणेकरांची खरेदी सुरू होती. दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास मुसळधार पाऊस कोसळल्याने खरेदीसाठी बाहेर पडलेल्या ठाणेकरांनी काही काळ दुकानाचा आडोसा घेतला. मात्र पाऊस कमी झाल्यावर पुन्हा खरेदी सुरू केली. मोदकांचे बुकिंग, पूजेचे साहित्य, मखराचे बुकिंग, सजावटीचे साहित्य ठाणेकरांनी खरेदी केले. दुपारच्या वेळेस खरेदीसाठी बाहेर पडलेल्या ठाणेकरांनी यादरम्यान, पोटपूजेसाठी उपाहारगृहांचा रस्ता धरला. फुले, उकडीच्या मोदकांची खरेदी वेळेवर केली जाणार असल्याचे ठाणेकरांनी सांगितले. सोमवार ते शुक्रवार कामाचे दिवस असल्याने, त्यात वर्क फ्रॉम होम असल्याने कामांच्या तासाला मर्यादा राहिलेली नाही. त्यामुळे कामाच्या दिवसांत खरेदीसाठी बाहेर पडणे कठीण असल्याने सुटीच्या दिवशी ठाणेकर खरेदीसाठी बाहेर पडले.
--------------------------
साधेच मखर विक्रीला
कोरोनामुळे अनेकांच्या खिशाला कात्री लागली, अनेक लोक बेरोजगार बनले, तर काहींच्या पगारात कपात झाली. या आर्थिक संकटातून वाट काढत गणेशोत्सव साजरा केला जाणार असला तरी, यंदा खिसा सांभाळूनच खरेदी होत आहे. ठाणेकरांनी यंदा मखराचा खर्च टाळला असल्याचे, मखर कलाकार कैलास देसले यांनी सांगितले. केवळ १० ते २० टक्केच मखरांचे बुकिंग झाल्याची खंत देसले यांनी व्यक्त केली. यंदा प्रतिसाद कमी असल्याने मखर कमी प्रमाणात बनविण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
............
मंदिर, झोपडी, कॅनव्हास फ्रेम, मोदक, आसन, मयूर आसन हे मखराचे विविध प्रकार पर्यावरणस्नेही मखरांमध्ये पाहायला मिळत आहेत.
.................