मीरा रोड : काशिमीरा येथे खड्ड्याने बळी घेतल्यानंतरही रस्त्यांची दुरवस्था आहे. पालिकेने खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले असले, तरी बहुसंख्य खड्डे कायम आहेत. त्यामुळे नागरिक खड्ड्यांमुळे त्रस्त आहेत.पावसाळ्यात मीरा-भार्इंदरमधील डांबरी रस्ते पूर्णपणे खड्ड्यांत गेले होते. पालिकेने भरपावसात पॅचवर्कची कामे केल्याने ते पॅचवर्कही पावसाने धुऊन काढले. त्यामुळे पॅचवर्कचे काही कोटी वाया गेल्याचा आरोप होत आहे. मुळात डांबरी रस्ता बनवताना तांत्रिक बाबींकडे दुर्लक्ष केले जाते. चांगल्या दर्जाचे डांबर व बांधकाम साहित्य वापरले जात नाही. रस्त्यांचा समतोल राखला जात नाही. विविध कामांसाठी खोदकाम केल्यानंतर केले जाणारे पॅचवर्कही थातूरमातूर असते. टेंडर आणि टक्केवारी या निकृष्ट आणि दर्जाहीन कामास कारणीभूत असल्याचे आरोप व तक्रारी सातत्याने होत आहेत.खड्ड्यांमुळे नागरिक तसेच वाहनचालक मेटाकुटीला आले आहेत. अपघाताचा धोका तसेच नागरिकांना कंबर, पाठ, मानदुखीचा विकार बळावतो. वाहनांचा खुळखुळा होऊन नुकसान होते ते वेगळेच. यंदाही खड्ड्यांमुळे काशिमीरा येथे तरुणाचा बळी गेला होता. तर, महापौर मॅरेथॉनसाठीच्या मार्गावर रातोरात खड्डे भरणाऱ्या पालिका आणि सत्ताधाऱ्यांना शहरातील अन्य रस्त्यांवरचे खड्डे बुजवावेसे वाटले नाहीत, यावरून टीकेची झोड उठली होती. पावसाळा यंदा लांबला असतानाच मधल्या काळात खड्डे भरण्यासाठी टाकलेली खडी निघाल्याने नागरिकांना आणखीनच त्रास झाला. परंतु, पावसाळा गेला असला तरी शहरातील अनेक रस्त्यांवरील खड्ड्यांचे साम्राज्य मात्र कायम आहे. खड्डेही खोल व मोठे असल्याने अपघाताची भीती कायम आहे. दुचाकीस्वारांना तर खड्डे सांभाळून वाहन चालवणे जिकिरीचे बनले आहे. महापालिकेने खड्डे बुजवण्याचे काम सुरू केले असले, तरी मोठ्या प्रमाणात असलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणी पालिकेचे शहर अभियंता शिवाजी बारकुंड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.यंदा पावसाळा लांबल्याने खड्डे मोठ्या प्रमाणात पडले आहेत. आम्हीदेखील सतत तक्रारी केल्या असून आता पालिकेने खड्डे भरण्याचे काम सुरू केले आहे. तरीही खड्डे अजूनही आहेत ही वस्तुस्थिती आहे. शहरातील सर्व खड्डे लवकरात लवकर भरून नागरिकांना दिलासा द्यावा.- नीला सोन्स, नगरसेविकामीरा-भार्इंदर महापालिकेतील टेंडर-टक्केवारीचे आरोप गंभीर असून शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था हा त्याचा बोलका पुरावा मानायला हवा. त्यातूनच निकृष्ट आणि अतांत्रिक दर्जाची कामे होत असल्याने खड्डे यावेळी मोठ्या प्रमाणात पडले आहेत. कामांचा दर्जा सुधारा आणि अर्थपूर्ण हेतूने चालणारा हस्तक्षेप थांबवून त्वरित खड्डे भरण्यात यावेत.- शंकर वीरकर, उपजिल्हाप्रमुख, शिवसेना
मीरा-भाईंदरमध्ये खड्ड्यांचे साम्राज्य कायम; पालिकेचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 10:40 PM