नितीन पंडित
भिवंडी - भिवंडी शहरातील पटेल कंपाऊंड येथे तीन मजली धोकादायक जिलानी इमारत कोसळल्याची घटना घडली असून, या दुर्घटनेत आतापर्यंत 38 जणांचा मृत्यू तर 25 जण जखमी झाले होते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसह राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या दुर्घटनेची दखल घेतली. मात्र भिवंडीतील अनधिकृत बांधकाम व अतिधोकादायक इमारतींमधील राहणाऱ्या निवाऱ्यासाठी कोणतेही ठोस निर्णय शासन स्तरावर घेतले जात नाही हे मोठे दुर्दैव आहे. भिवंडी मनपा प्रशासनाकडून शहरातील धोकादायक व अतिधोकादायक इमारतींना नोटीस देण्याचा दिखावा केला जातो, मात्र पुढे काय हा प्रश्न अनुत्तरीतच राहत असल्याने शहरात आजपर्यंत सुमारे 782 अतिधोकादायक इमारती आजही उभ्या आहेत. या इमारतींमध्ये आजही जीव मुठीत धरून लोक राहत आहेत. असे असतानाच भिवंडी मनपाच्या अखत्यारीत असलेल्या व मनपाचे कर्मचारी राहत असलेल्या अनेक इमारतीदेखील धोकादायक असून, मनपाचे कर्मचारी आजही या धोकादायक इमारतींमध्ये राहत आहेत. त्यामुळे जिलानी इमारत दुर्घटनेप्रमाणे मनपाच्या कर्मचाऱ्यांची एखादी इमारत कोसळून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र मनपा प्रशासन आपल्याच कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळात असल्याने मनपा आयुक्त डॉ. पंकज आशिया हे आतातरी या धोकादायक इमारतींची व आपल्या कर्मचाऱ्यांच्या धोकादायक वास्तव्याची दखल घेतील का हाच प्रश्न पडला आहे.
शहरात मनपाच्या अखत्यारीत असलेल्या कर्मचारी वसाहतींमधील अनेक इमारती आज धोकादायक आहेत. मनपाचे सुमारे 525 कर्मचारी कुटुंब या धोकादायक इमारतींमध्ये वास्तव्यास आहेत. भिवंडी महापालिकेच्या प्रभाग समिती एक ते पाचमध्ये पालिकेच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी 46 निवासस्थाने आहेत, त्यांची सध्या दुरवस्था झाली असून, सदरची निवासस्थाने ही धोकादायक स्थितीत असून पालिकेने त्यांना वारंवर नोटीस दिल्या. मात्र त्यांच्या राहण्याची सोय करण्याबाबत पर्याय शोधला नसल्याने निवासस्थाने खाली करण्यास कर्मचारी सफाई कामगार तयार नाहीत. त्यामुळे पालिका आयुक्त प्रशासन असमर्थ ठरल्याचे दिसून येते. त्यामुळे या 525 कुटुंबं जीव मुठीत घेऊन राहावे लागत आहेत.
शहरातील संगम पाडा येथील कर्मचारी वसाहतीत सुमारे 172 कुटुंबं आहेत, कोंबड पाडा (56 कुटुंब ), पद्मनगर (72 कुटुंब ), धामणकर नाका फायरब्रिगेड (10 कुटुंब ), वाजमोहल्ला (32 कुटुंब ), वाटर स्लपाय पद्मनगर (36 कुटुंब ), कोटारगेट आझाद गार्डन (32 कुटुंब ), भय्या साहेब आंबेडकर नगर (12 कुटुंब), शिवाजी नगर भाजी मार्केट (48 कुटुंब), मिल्लत नगर, कामतघर, पद्मनगर प्रेमाताई हॉल, भावना मंगल कार्यालय ताडली, फेणे गाव, शास्त्रीनगर (19 कुटुंब ), अजय नगर (10 कुटुंब ), फायर ब्रिगेड कासार आळी (8 कुटुंब) अशी सुमारे 46 निवासस्थाने पालिका कार्यक्षेत्रात कर्मचाऱ्यांसाठी आहेत. ज्यात सुमारे शेकडो कर्मचारी व अधिकारी आजही राहत आहेत. विशेष म्हणजे यातील अनेक इमारती 30 ते 40 वर्षं जुनी असून, सध्या त्यांची दुरुस्ती न झाल्याने ती दुरवस्थेत आहेत. अडगळीच्या ठिकाणी असलेल्या या घरांची व इमारतींची अनेक आयुक्त व पालिकेच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली आहे. मात्र ते दूरस्त करण्यास असमर्थ ठरल्याने या निवासस्थानाची अवस्था दयनीय आहे. विशेष म्हणजे मनपा प्रशासनाने या इमारतींवर दुरुस्तीच्या नावावर कोट्यवधींचा खर्च देखील केला आहे. मात्र तरी देखील या इमारतींची आता दुरवस्था झाली आहे. बहुतांश ठिकाणी घराचे छपरं प्लास्टर निघालेले आहेत तर काही इमारतीवर झाडे उगवली आहेत. याबाबत रहिवासी कर्मचाऱ्यांनी पालिकेच्या बांधकाम व उद्यान विभागाकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र ती झाडे तोडली गेली नसल्याने इमारत कमकुवत झाली आहे, अशी माहिती कामगार संघटनेचे कामगार कर्मचारी संघर्ष कृती समितीचे महेंद्र कुंभारे, भानुदास भसाळे, श्रीपत तांबे, संतोष चव्हाण, भारत तांबे यांनी दिली आहे. विशेष म्हणजे यासंदर्भात पालिका आयुक्त व प्रशासनाकडे कृती समितीच्या वतीने वारंवार निवेदन देण्यात आली आहेत. मात्र प्रशासनाने त्याकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे, अशी माहिती कृती समितीच्या सदस्यांकडून देण्यात आली आहे.