भिवंडी : सरकारच्या बालस्वास्थ्य योजनेंतर्गत पालिकेच्या आरोग्य केंद्रात मागील १० वर्षे नियमित सेवा करणाऱ्या ४५ परिचारिकांसह ५५ डॉक्टरांना १० महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. त्यामुळे आपल्या व्यथा मांडण्यासाठी आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांची भेटीची वेळ घेऊन आलेल्या महिलांना कार्यालयाबाहेर तब्बल दीड तास ताटकळत ठेवले. आयुक्त मागील दरवाजातून परस्पर निघून गेल्याने महिला परिचारिकांनी संताप व्यक्त केला आहे.पालिका क्षेत्रात २००६ मध्ये प्रजनन व बालस्वास्थ्य योजनेंतर्गत १५ आरोग्य केंदे्र सुरू करण्यात आली. वेतनासाठी मिळणारे अनुदान कमी होत गेल्याने २०१० पासून संपूर्ण वेतनाची तरतूद पालिकेला तिजोरीतून करावी लागत होती. २०१६ च्या अर्थसंकल्पात या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी आर्थिक तरतूद न केल्याने मार्च २०१६ पासून या सर्व कर्मचाऱ्यांना वेतनाशिवाय आपली सेवा बजावावी लागत आहे.यासंदर्भात वेळोवेळी आयुक्त, महापौर, विविध पक्षांचे लोकप्रतिनिधी यांच्या भेटी घेऊन आपली कैफियत त्यांच्यासमोर मांडल्या. त्यांच्या पदरी निराशा पडल्याने पुन्हा एकदा आयुक्तांची भेट घेतली असता त्यांनी आठवड्याचा वेळ मागून घेत पुन्हा भेटीला बोलवले होते. त्यांना कार्यालयाबाहेर दीड तास ताटकळत ठेवून आयुक्त कार्यालयाच्या कक्षात बसलेल्या महिला परिचारिका, डॉक्टर यांना न भेटताच अॅण्टी चेंबरच्या मागील दारातून निघून गेले. ते जात असताना काही महिला कर्मचारी आयुक्तांच्या भेटीस धावल्या. (प्रतिनिधी)
आरोग्य केंद्राचे कर्मचारी वेतनाविना
By admin | Published: January 13, 2017 6:45 AM