ठाणे : जिल्हा परिषदेने महाआॅनलाइन कंपनीद्वारे संग्राम कक्ष सुरू केले आहेत. परंतु, या कंपनीने कर्मचाऱ्यांचे सुमारे तीन ते चार महिन्यांचे वेतन रखडवल्यामुळे ऐन सणासुदीत त्यांना उपासमारीला तोंड द्यावे लागत आहे. यामध्ये महिला कर्मचाऱ्यांचादेखील समावेश आहे. जिल्हा परिषदेसह ग्रामपंचायतींना आॅनलाइन सेवा देणाऱ्या या महाआॅनलाइन कंपनीच्या नियंत्रणात काम करणारे कॉम्प्युटर आॅपरेटर, डाटा एण्ट्री आॅपरेटर आदी सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना दरमहा वेतन देणे अपेक्षित आहे. याशिवाय, जिल्हा परिषद या शासकीय कार्यालयाच्या या कंपनीला किमान वेतन देणे अपेक्षितच आहे. पण, त्याची पायमल्ली करून कर्मचाऱ्यांना अत्यल्प वेतन दिले जात आहे. एवढेच नव्हे तर तीनतीन महिने वेतन रखडवल्यामुळे कर्मचाऱ्यांची उपासमार सुरू आहे. खरेतर, जिल्हा परिषदेने प्राप्त झालेल्या तक्रारींस अनुसरून संबंधित कंपनीवर कारवाई करणे अपेक्षित आहे. यासंदर्भात ग्रामपंचायतीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील यांना विचारणा केली असता, ते म्हणाले की, या आधीही अशा तक्रारी आलेल्या आहेत. महाआॅनलाइन कंपनी शासनाने दिलेली आहे. त्यांचे वेतन आतापर्यंत आपण अगदी वेळेवर केलेले आहे. याशिवाय, वेतन वेळेवर करण्याच्या सूचना कंपनीला दिल्याचे पाटील यांनी सांगितले. पण, जिल्हा परिषद याकडे दुर्लक्ष करून जबाबदारी झटकत असेल तर या कर्मचाऱ्यांसाठी कामगार न्यायालयात जाण्याचे प्रयत्न एका संघटनेने सुरू केले आहे. (प्रतिनिधी)
जि.प.च्या महाआॅनलाइनने वेतन रखडल्यामुळे कर्मचाऱ्यांची उपासमार
By admin | Published: October 24, 2015 1:10 AM