नितिन पंडीत -
भिवंडी - भिवंडी प्रांताधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार विठ्ठल गोसावी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केल्यानंतर भिवंडी प्रांताधिकारी कार्यालयात विविध पक्ष संघटना कार्यकर्ते प्रांत कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपल्या कामांसाठी विनाकारण धमकावत असल्याने भिवंडी प्रांत अधिकारी कार्यालयातील कर्मचारी प्रचंड मानसिक तणावात काम करत आहेत.
बुलेट ट्रेन, मुंबई वडोदरा, समृद्धी महामार्ग, गॅस पाईपलाईन , रेल्वे कॉरिडोर यांसारखे अनेक शासकीय प्रकल्प भिवंडी प्रांत अधिकारी कार्यालयाच्या अखत्यारीत आहेत. या प्रकल्पांसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी मोठ्या प्रमाणात बाधित झाल्या आहेत. या जमिनीचा शासकीय मोबदला शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी प्रांताधिकारी कार्यालयात अनेक दलालांचा सुळसुळाट आहे. प्रांत कार्यालयातील कर्मचारी मोबदला देताना लाचेची मागणी करत असल्याचा आरोप अनेक पक्षसंघटनांचे कार्यकर्ते उघडपणे करत आहेत.
काही संघटनांनी तर प्रांत कार्यालायविरोधात उपोषणाचे हत्यार उपसले असल्याने इतर दलाल याच आंदोलनांचा फायदा उठवून कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास देऊन कामे करण्यासाठी दबाव टाकत असल्याची खंत प्रांत कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी बोलून दाखवली. तर अनेक जण कर्मचाऱ्यांना थेट धमकी व दमदाटी करून आपले काम करून घेण्यासाठी मानसिक दबाव देखील टाकत आहेत.
वाढत्या प्रकल्पांमुळे प्रांताधिकारी कार्यालयातील कामाचा ताण आधिक वाढला आहे. यातच अने लोक भ्रष्टाचाराच्या नावाने टोमणे देत, तसेच दमदाटी करत कामे करून घेण्यासाठी तगादा लावत असल्याचे भिवंडी प्रांत अधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
लाचलुचपत विभागाने केलेल्या कारवाईनंतर भिवंडीतील अनेक पक्ष संघटना, एजंट यांचा प्रांताधिकारी कार्यालयात सुळसुळाट वाढला असून कुणीही उठतो आणि काहीही आरोप करतो, यामुळे कार्यालयातील कर्मचार्यांवर नक्कीच कामाचा ताण वाढला असून कर्मचारी मानसिक दबावाखाली आहेत. ही गोष्ट नाकारता येत नाही, मात्र जर कर्मचाऱ्यांकडून कोणत्याही प्रकारची चूक होत असेल अथवा काम वेळेवर होत नसेल तर तक्रारदारांनी माझ्याशी संपर्क साधणे गरजेचे आहे. मात्र अनेक तक्रारदार मला न भेटताच अथवा त्यांची तक्रार न सांगताच जात असल्याने माझ्यापर्यंत नागरिकांच्या तक्रारी येत नाहीत. मात्र सध्या अनेक कार्यकर्ते प्रांत कार्यालयाविरोधात जाहीर भाष्य करत असल्याने कर्मचाऱ्यांवर निश्चितच ताण वाढला आहे, अशी प्रतिक्रिया भिवंडी प्रांताधिकारी बाळासाहेब वाकचौरे यांनी दिली आहे.