अजित मांडके, ठाणे : ठाणे शहरातील महिलांच्या सक्षमीकरणावर भर देतांनाच त्यांना त्यांच्या पायावर उभे करण्याबरोबरच त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी ठाणे महापालिकेने आपल्या खांद्यावर घेतली आहे. याशिवाय त्यांना स्वयंरोजगाराच्या संधी देखील उपलब्ध करुन देण्याबरोबर ठाणे परिवहनच्या सेवेत महिलांना ५० टक्के सवलत, विशेष सेवा सुरु करणे आदींसह महिलांच्या आरोग्याला देखील प्राधान्य दिले जाणार आहे. महिलांसह शहरातील जेष्ठ नागरीकांना विरंगुळा केंद्रासह ६० वर्षावरील व्यक्तींना ठाणे परिवहनच्या सेवेतून मोफत प्रवासाची हमी ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली आहे.
ठाणे महापालिकेच्या २०२४-२५ चा ५०२५.०१ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आयुक्तांनी गुरुवारी सादर केला. यात महिलांना विशेष प्राधान्य देण्यात आले असल्याचे अधोरेखीत झाले आहे. समाजाच्या जडण घडणीत महिलांचा वाटा हा नेहमीच अग्रेसर राहिला आहे. त्यामुळे महिलांनी अधिकाधिक संख्येने आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमामध्ये सक्रीय सहभाग नोंदविण्यासाठी महापालिकेने विशेष उपक्रम हाती घेतले आहेत.
महिला बचत गटांना शून्य व्याज दराने कर्ज योजना - महिला बचत गटांना व्यवसाय सुरु करण्यास उत्तेजन देण्यासाठी महापालिकेच्या समन्वयाने बँकाकडून कर्ज उपलब्ध करुन देणे, बँकेकडून कर्ज घेतल्यास नियमित कर्ज फेडणाºया बचत गटांना व्याजाच्या स्वरुपात सबसीडी देणे. यासाठी महापालिकेने आता महिला बचत गटांना शुन्य व्याज दराने कर्ज योजना राबविण्याचे प्रस्तावित केले असून त्यासाठी २०२४-२५ या आर्थिक वर्षात १ कोटींची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे.
धर्मवीर आनंद दिघे स्वयंरोजगार योजना : सर्वसाधारण महिलांना स्वंयरोजगार निर्माण करुन त्यांचे सक्षमीकरण व जीवनामान उंचविण्याच्या दृष्टीने ही योजना सुरु करण्यात आली आहे. त्यानुसार यासाठी महिला व बालकल्याण कार्यक्रमाअंतर्गत आवश्यक तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे.
महिला बचत गटांच्या उत्पादनांची विक्री व प्रदर्शन - महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तुंना बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी त्यांनी उत्पादीत केलेल्या वस्तुंसाठी प्रदर्शन व विक्री करण्यासाठी दालन उपलब्ध करुन देऊन त्यासाठी १ कोटींची तरतूद करण्यात येणार आहे.
महिलांसाठी विशेष परिवहन सेवा - परिवहन बसमध्ये सध्या ३३ टक्के महिलांसाठी सीट्स आरक्षित आहे. परंतु गर्दीच्या वेळेस महिला प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन बसच्या डाव्याबाजूकडील सर्व सीट्स महिलांसाठी राखीव, गर्दीच्या वेळेत ठराविक मार्गावर स्वतंत्र महिला बससेवा, सर्व महिलांना परिवहनच्या बसमधून ५० टक्के सवलत योजना
महिला सुरक्षितता - ठाणे शहर पोलीस विभागाच्या मदतीने सुरक्षा नियंत्रण कक्ष स्थापन करणे, तक्रारदार महिलांना तक्रार करण्यासाठी हेल्पलाईन क्रमांक, तक्रार व त्याचे निवारण यातील कालावधी कमी करण्यासाठी प्रयत्न यासाठी ५० लाखांची तरतूद
महिला शौचालय - महिलांसाठी मार्केट परिसर, उद्यानात, नव्याने शौचालय निर्माण करण्यासाठी ५ कोटी, माझी आरोग्य सखी योजने अंतर्गत आरोग्य विषयक सेवांचे विस्तारीकरण करण्यात येणार असून स्त्री रोग तज्ञ डॉक्टर यांच्या मार्फत महिलांची आरोग्य तपासणी, तसेच ब्रेस्ट कॅन्सर व गर्भाशयाच्या मुखाचे कॅन्सर स्क्रिनींग.
मुख्यमंत्री मातृत्व सुरक्षा योजना - आशा स्वयंसेविकांना दिवाळी भाऊभीज भेट अंतर्गत आशा स्वंयसेविकांनी गर्भवती महिलांची माहिती घेऊन गरोदर मातेची १२ आठवड्याच्या आत नोंदणी केल्यास तसेच गरोदर मातेचे ट्रॅकींग करुन गरोदरपणातील आवश्यक सेवा दिल्यास कामावर आधारीत अतिरिक्त मोबदला, यासाठी ५ कोटी तरतूद प्रस्तावित.
सर्व प्रसुतीगृहांचे बळकटीकरण - यात महापालिका हद्दतील सर्वच प्रसुतीगृहांचे बळकटीकरण केले जाणार असून ऑपरेशन थिएटर, डायलेसीस केंद्र, एन.बी.एस.यु सेवा उपलब्ध करुन देणे, स्त्री रोग तंज्ञाची कंत्राटी स्वरुपात भरती, कोपरी येथे एसएनसीयु कक्षाची सुरवात, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एनआयसीयु कक्षाची क्षमता ५० पर्यंत वाढविण्याचे प्रयत्न याशिवाय गरोदर मातांना पोषण आहार योजनेसाठी ३ कोटी, मातृत्व भेट योजना राबविण्यात येणार आहे.
जेष्ठ नागरीकांसाठी सुविधा - या योजने अंतर्गत महापालिकेच्या उद्यानांमध्ये व उपलब्ध मोकळ्या जागांवर जेष्ठ नागरीकांसाठी विरंगुळी केंद्र, जेष्ठ नागरीक भवन तयार करुन त्यामध्ये काळजी घेण्यासाठी केअर टेकर, वाचनासाठी पुस्तके तसेच आरोग्यासाठी क्लासेस, योग प्रशिक्षण वर्ग आदींसाठी विशेष तरतूद याशिवाय ६० वर्षावरील जेष्ठ नागरीकांना टीएमटीच्या बसमधून मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.