कल्याण : पश्चिमेतील नॅशनल उर्दू शाळेची भिंत कोसळून तिघांचा मंगळवारी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर कल्याण-डोंबिवली पालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी बुधवारी अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेऊन संरक्षक भिंतीलगतच्या घरांमध्ये राहणाºया रहिवाशांना घरे रिकामी करण्याचे आदेश दिले आहेत.आयुक्तांनी बुधवारी सकाळी पुन्हा घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर, त्यांनी प्रभाग अधिकारी, शहर अभियंता, उपायुक्त आणि बेकायदा बांधकाम नियंत्रण विभागाची बैठक घेतली. यावेळी त्यांनी संरक्षक भिंतीलगतची बेकायदा घरे तातडीने रिकामी करण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर पूर, अपघातप्रवण ठिकाणे आणि टेकडी परिसरात राहणाऱ्यांना घरातून बाहेर काढावे, अशीही सूचना केली. धोकादायक व अतिधोकादायक इमारतींमधील घरे रिकामी करून रहिवाशांना अन्य ठिकाणी स्थलांतरित करण्याचे सूचित केले आहे. बांधकामांच्या ठिकाणी संरक्षक भिंती सुस्थितीत आहेत का, याचे सर्वेक्षण करून अहवाल द्यावा. तेथे कोणी राहत असल्यास त्यांना तेथून हटवावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.- कल्याण पूर्वेला कचोरे आणि नेतिवली टेकडीवर झोपड्या आहेत. या टेकडीचा भाग पावसात खचू शकतो. मात्र, तेथील रहिवाशांच्या सुरक्षिततेसाठी महापालिकेकडे काहीच उपाययोजना नाहीत. तसेच संक्रमण शिबिरांचीही व्यवस्था नाही. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात घरातून रहिवाशांना बाहेर काढल्यास त्यांच्या राहण्याची पर्यायी व्यवस्था भरपावसात कुठे व कशी करणार, याचे उत्तर महापालिका प्रशासनाकडे नाही. संक्रमण शिबिरे नसताना रहिवाशांना बाहेर काढणे कितपत योग्य आहे, असा सवाल केला जात आहे. लोकांचा जीव वाचवणे हे महापालिका महत्त्वाचे समजते. मग, त्यांना रस्त्यावर भरपावसात राहावे लागले तरी चालेल, असाच त्याचा अर्थ आहे का, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.तसेच, या घटनेत जखमी झालेल्या आरती कर्डिले (१६) हिच्यावर कळवा येथील रुग्णालयात उपचार सुरू असून तिच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत असल्याचे सूत्रांनी सांगितले.दरम्यान, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. केडीएमसीकडून अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती बाजारपेठ पोलिसांनी दिली.
तिघांचे मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यातनॅशनल उर्दू शाळेची संरक्षक भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृत पावलेल्या तिघांचे मृतदेह बुधवारी त्यांच्या नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. या दुर्घटनेत शोभा कांबळे (६५), करिमा हुसेन महंमद आणि तिचा मुलगा हुसेन (३) यांचा मृत्यू झाला होता. शोभा यांचा मृतदेह त्यांच्या मुलाच्या ताब्यात दिला असून, त्यांच्यावर जालना येथील मूळगावी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. तर, करिमाचा पती आणि बहिणीच्या ताब्यात करिमा व हुसेन या दोघांचे मृतदेह सोपवण्यात आले. या दोघांवरही मुंबईतील दफनभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.