कल्याण : डोंबिवलीच्या रिजन्सी मैदानात मत्स्यमेजवानी ठेवण्यात आली होती. ही मेजवानी हातची जाऊ नये म्हणून खवय्यांनी ऑनलाइन बुकिंग आणि रोख रक्कम भरून कुपन घेतले. प्रत्यक्षात, मेजवानीवर ताव मारण्याची वेळ आली, तेव्हा खवय्यांच्या नशिबी रिकामी थाळी आणि खुर्च्या-टेबल आले. आयोजक पैसे घेऊ न फरार झाल्याने मेजवानी तर सोडाच, उलट उपाशी राहण्याची वेळ खवय्यांवर आली. फसवणूक झालेल्या खवय्यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊ न आरोपीविरोधात लेखी तक्रार दाखल केली.डोंबिवली व उपनगरांतील रेल्वेस्थानकाबाहेर, आॅनलाइन व सोशल मीडियावर मत्स्यमेजवानीची जाहिरातबाजी केली. एका व्यक्तीला ५०० रुपये, दोन व्यक्तींचे आॅनलाइन बुकिंग केल्यास ८०० रुपये, जागेवर पैसे भरून कुपन घेतल्यास दोन व्यक्तींना एक हजार रुपये अशी जाहिरात करण्यात आली होती. या मेजवानीत सुरमई, पापलेट, बांगडा, कोळंबी फ्राय, सुरमई कालवण, कोळंबी लपेटा, सुका जवळा, कोळंबी बिर्याणी, सोलकढी, पिण्याच्या पाण्याची बाटली असा मेनूही ठरला होता. ही अनलिमिटेड थाळी असेल, असेही प्रलोभन दाखवण्यात आले होते. ‘स्वस्य’ असे आयोजक संस्थेचे नाव कुपनवर नमूद केले होते. २४ ते २६ मे यादरम्यान मत्स्यमेजवानीचे आयोजन होते. ठरल्यप्रमाणे खवय्ये पोहोचले. तेथे जेवणासाठी खुर्च्या व टेबल्स लावले होते. एका कोपऱ्यात चिरलेला कांदा, लिंबू, अदरक हे साहित्य पडले होते. तसेच तांदळाच्या भाकरी होत्या; मात्र माशांचा पत्ताच नव्हता. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच खवय्यांनी मानपाडा पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी खवय्यांची तक्रार नमूद करून घेतली आहे.ठाकुर्लीतील कॅटरर्स व्यावसायिक रमेश वैती यांनी सांगितले की, २४ मे रोजी सकाळीच काही लोक माझ्याकडे भांडी बुकिंग करण्यासाठी आले होते. त्यांनी ३० हजार रुपयांची अनामत रक्कम भरली. मी भांडी घेऊन वेळेवर पोहोचलो होतो. आयोजकाचा पत्ता नव्हता. यासंदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा हरी चौरे यांनी सांगितले की, आयोजकांचा तपास सुरू केली आहे. आयोजकांचे नियोजन चुकल्याने बेत फसल्याची प्राथमिक माहिती चौकशीतून समोर येत आहे.>‘आमची आर्थिकफसवणूक झाली’डोंबिवलीतील रहिवासी प्रदीप चुडनाईक यांनी सांगितले की, मेजवानीच्या जाहिरातीचे पत्रक पाहून १६०० रुपयांचे कुपन घेतले होते. आमची फसवणूक झालेली आहे. ठाण्याहून आलेले मंगेश भावसार यांनी सांगितले की, मी या मेजवानीचा आनंद घेण्यासाठी कुपन घेतले होते. घरातून निघताना मी मेजवानीच्या ठिकाणी फोन केला होता. तेव्हा तरी नियोजन नसल्याचे आयोजकांनी सांगणे गरजेचे होते. त्यांच्याकडून तसे काही कळवले गेले नाही. आमची आर्थिक फसवणूक झालेली आहे.
मेजवानीच्या नावाने रिकामी थाळी अन् टेबल-खुर्च्या...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 12:36 AM