नितिन पंडीत
भिवंडी - भिवंडी महापालिका बचत गटाच्या माध्यमातून दिवाळी निमित्त फराळ साहित्य व अन्य वस्तू तसेच साहित्याची विक्री आदींचे प्रदर्शन मनपाच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. शनिवारी महापौर प्रतिभा पाटील यांनी या प्रदर्शनाचे उदघाटन केले. यावेळी बचत गट महिलांनी तयार केलेल्या वस्तू खरेदी करा, व महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रोत्साहित करा असे आवाहन महापौर पाटील यांनी शहरवासीयांना केले.
भिवंडी पालिकेच्या मुख्यालय जवळ दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका विभाग व महिला बालकल्याण विभागाच्या वतीने या मेळावा तसेच बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन तसेच दिवाळी साहित्य विक्री मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात शहरातील २२ महिला बचत गटांनी सहभाग नोंदवला असून २९ ऑक्टोंबर ते १ नोव्हेंबर पर्यंत हे प्रदर्शन व साहित्य विक्री सकाळी ९ ते रात्री ९ वा.पर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती मनपा जनसंपर्क विभागाकडून देण्यात आली आहे. याप्रसंगी आहे. या प्रसंगी शहर स्थरसंघ आणि वस्ती स्थर संघाच्या अध्यक्षा चंदा बॅनर्जी, सुशीला कांबळे, उज्ज्वला बनगे, रमा अंक्कंम, रमा बोदुला, कैलास पाटील, संजय ठाकरे , सारिका परदेशी ,समूह संघटक धनश्री मेस्त्री, महिला बाकल्याण विभाग प्रमुख स्नेहल पुण्यार्थी तसेच महिला बालविकास विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.