वाडा : वाडा शहरातील खंडेश्वरी नाका ते परळी नाका या मुख्य रस्त्यावर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले असून अतिक्रमणामुळे नेहमीच वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिकांना त्याचा त्रास होत होता. प्रशासन त्याकडे डोळेझाक करीत असल्याने येथील सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल मोरे व फयेज शेख यांनी गेल्या सोमवारी अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते.
या उपोषणाची त्याच दिवशी दखल घेऊन येत्या काही दिवसात अतिक्रमण हटविण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिल्याने उपोषण स्थगित करण्यात आले होते. दरम्यान, पोलीस प्रशासनाने बुधवारी हे अतिक्रमण हटविल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. शहरातील मुख्य रस्त्याचे अलीकडेच रुंदीकरण करण्यात आले आहे. रस्त्याच्या बाजूला गटारीचे बांधकाम करण्यात आले आहे. या गटारावर हातगाडीवाले, फेरीवाले, फळ, भाजी, मासळी विक्रेते आदी व्यावसायिकांनी बसून अतिक्रमण केले आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना चालताना रस्त्यावरून चालावे लागते. परिणामी किरकोळ अपघात घडतात. तसेच खरेदीसाठी आलेले ग्राहक आपल्या गाड्या रस्त्यावरच पार्क करत वस्तू खरेदी करतात. त्यामुळे येथे नेहमीच वाहतूक कोंडी होत असते. हे अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी नगरपंचायत, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस व तहसीलदार प्रशासन यांच्याकडे वारंवार तक्रारी करूनही ते डोळेझाक करीत होते. येथील सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल मोरे व फयेज शेख यांनी सोमवारी तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले. या उपोषणाची तत्काळ दखल घेत आज पोलीस प्रशासनाने सकाळपासूनच अतिक्रमण हटविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.