उल्हासनगर : शहरातील कल्याण ते बदलापूर मुख्य रस्त्यावर धोकादायक स्वरूपात उभे केलेल्या वाहनावर महापालिका अतिक्रमण विभागाने कारवाई केली. चार चाकी व दुचाकी वाहनांवर कारवाई करून पन्नास हजाराचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली आहे.
उल्हासनगरातील बहुतांश रस्ते अरुंद असल्याने, वाहतूक कोंडीची समस्या शहरात आहे. शहरातून जाणारा कल्याण ते बदलापूर रस्त्याचे १०० फुटाचे रुंदीकरण झाले. मात्र रस्त्याच्या दोन्ही बाजूला अवैधपणे चार चाकी व दुचाकी गाड्या पार्किंग केल्या जातात. या वाहनांचा अवैध पार्किंगमुळे अपघात होण्याची शक्यता आहे. अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी अतिक्रमण विभागाला आदेश देऊन अश्या गाड्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले. सहायक आयुक्त व अतिक्रमण विभागाचे प्रमुख गणेश शिंपी यांच्या नेतृत्वाखाली अवैधपणे पार्किंग केलेल्या वाहनांवर कारवाई केली. तसेच एकाच दिवसात ५० हजाराचा दंड वसूल केला. यानंतर अवैधपणे पार्किंग केलेल्या वाहनावर कारवाई करण्याचे संकेत शिंपी यांनी दिली. तर दुसरीकडे कोणतेही सूचना न देता गाड्यावर कारवाई केल्याचा निषेध व्यापाऱ्यांनी केला.
शहरातील रस्त्यावर धोकादायक स्थितीत वाहने उभ्या करणाऱ्यांवर पोलिसांनीही दंडुक उगारला आहे. गेल्या आठवड्यात विविध पोलीस ठाण्यात रस्त्यावर धोकादायक स्थितीत लावलेल्या गाड्या चालकांवर गुन्हे दाखल झाले. चौक, मुख्य रस्ते, गर्दीचे ठिकाण, मार्केट आदी ठिकाणी अवैधपणे पार्किंग केलेल्या वाहनावर कारवाईचे संकेत महापालिका अतिक्रमण विभागाणे दिल्याने, व्यापारी व नागरिकांचे धाबे दणाणले आहेत.