लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत जवळपास सात मोठे तलाव आहेत. त्यांपैकी काळा तलावाचा स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत विकास केला जात आहे. त्याचबरोबर गौरीपाडा येथील तलावाची भिंत बांधण्याचे काम सुरू होते. मात्र, बांधलेली भिंतही ढासळली आहे. दरम्यान, अन्य तलावांचा विकास हा कागदावरच राहिला आहे.
महापालिकेच्या हद्दीतील तलावांवर झालेली अतिक्रमणे महापालिकेकडून हटविली जात नाहीत. काही तलावांच्या जागेवर अतिक्रमण करण्यात आले आहे, तर काही तलाव भूमाफियांनी गिळंकृत करून त्यावर चाळी उभारण्याचे काम केले आहे. मात्र, या सर्व प्रकारांकडे महापालिका प्रशासनाची डोळेझाक सुरू आहे. तलाव हे नैसर्गिक जलस्रोत आहेत. भविष्यात जलसंकट तयार झाल्यावर त्यातून पाणीपुरवठा केला जाऊ शकतो. तलावाचे पाणी हे पिण्यासाठी योग्य नसले तरी अन्य कामांसाठी वापरले जाऊ शकते. अन्यथा तलावाचे सुशोभीकरण मनोरंजनाचे केंद्र तेथे विकसित केले जाऊ शकते, याकडे जाणकारांनी लक्ष वेधले आहे.
--------------------------------------------------
हे घ्या पुरावे
१. कल्याणमधील भटाळे तलावाच्या जागेवर विकास आराखड्यात आरक्षण टाकण्यात आले होते. आरक्षण हटविले गेले असले तरी त्या जागेवरील अतिक्रमण कायम आहे. मागील चार वर्षांत टीएलआरकडून सर्वेक्षण करण्यात आलेले नाही.
२. आटाळी परिसरातील मोठा तलाव हा बुजविण्यात आला. त्या तलावावर भूमाफियांनी अतिक्रमण केले आहे. तलाव बुजवून तेथे चाळी उभारण्यात आल्या आहेत.
३. डावजे तलावाची जागा एका खासगी विकासकास हॉटेल विकसित करण्यासाठी महापालिकेने लीजवर दिली होती. हा करारही संपुष्टात आला आहे. तरीदेखील हा तलाव संबंधितांकडून परत घेण्याची तसदी प्रशासनाकडून घेतली जात नाही.
--------------------
नदीनाल्यालगत इमारती
कल्याण पश्चिममधील संतोषीमाता रोडवर एक इमारत चक्क नाल्यावर उभारण्यात आली आहे. प्रशासनाकडून त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्याचबरोबर वालधुनी नदीकिनारी योगीधाम, घोलपनगर ही नगरे वसली आहेत. नदीकिनारी सखल भाग, पूरनियंत्रण रेषेचा विचार न करता नदी किनारी अतिक्रमणे करण्यात आली आहेत. ही बाब यंदाच्या अतिवृष्टीतही उघडकीस आली आहे.
-----------------------------
टप्प्याटप्प्याने तलावांचा विकास
महापालिका हद्दीतील सात तलावांपैकी काळा तलावाच्या विकासावर १० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. तसेच स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत पुन्हा १७ कोटी रुपये खर्चून विकास केला जाणार आहे. गौरीपाडा तलाव सुशोभित केला जात आहे. टप्प्याटप्प्याने तलावाचा विकास केला जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
-------------------------
प्रशासनाचे दुर्लक्ष
केडीएमसीने काळा तलाव विकसित केला आहे. मात्र, अन्य तलावांच्या विकासाबाबत प्रशासनाची उदासीनता आहे. अनेक तलाव बुजवून त्या जागेवर चाळी उभारल्या जात आहेत. भटाळे तलावाच्या जागेवरील आरक्षण हटविण्यासाठी नगरविकास खात्याकडे पाठपुरावा केला. सरकारने आरक्षण हटविले. मात्र चार वर्षांत महापालिका आणि टीएलआर खात्याकडून जागेचे सर्वेक्षण करण्यात आलेले नाही. रहाटाळे, आधारवाडी, उंबर्डे, डावजे या तलावाच्या विकासासाठी प्रशासनाने एकात्मिक विकास आराखडा तयार केला पाहिजे. उंबर्डे तलावाचा विकासासाठी स्थायी समितीने पुढाकार घेतला होता. मात्र, पुढे काही झाले नाही. नैसर्गिक जलस्त्रोतांचे संवर्धन करणे गरजे आहे.
- सचिन बासरे, माजी नगरसेवक, शिवसेना
----------