लोकमत न्यूज नेटवर्क
सुरेश लोखंडे, ठाणे : येऊर व संजयगांधी राष्ट्रीय उद्यानाची सीमेवर भूमाफियांनी मोठ्या प्रमाणात घुसखोरी केली आहे. त्यामुळे आता वन विभाग ॲक्शन मोड मध्ये आला असून चेना परिमंडलातील पानखंडा या राखीव वनामध्ये अनधिकृत रित्या निवासी अणि व्यवसायिक कामासाठी तब्बल १२ एकरच्या भूखंडावरील अतिक्रमण वन विभागाने कारवाई करून आज जमीनदोस्त केलं आहे.
मुंबई व ठाणे शहराला लाभलेल्या नैसर्गिक वनसंपदेच्या येऊर, संजयगांधी राष्ट्रीय उद्यानाचा परिसर वाढत्या अतिक्रमणाने वेढला आहे. त्यामुळे या जंगलातील जैव विविधता धोक्यात आली आहे. जंगलावर अनधिकृत कब्जा करून अनेक धनदांडग्यांनी निवासी हॉटेल, रिसॉर्ट उभारले आहेत. परंतु आता वन विभागाने अशा या अनधिकृत बांधकामावर कारवाईची बडगा उचलला आहे. शनिवारी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पाणखंडा (ओवळा) येथील सर्व्हे क्रमांक २९१ मधील राखीव वनक्षेत्रात असलेले अतिक्रमण संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे संचालक आणि मुख्य वन संरक्षक जी. मल्लिकार्जुन, उपसंचालक उदय ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली जमीनदोस्त करून हा भूखंड मोकळा केला आहे , अशी माहिती येऊर वन परिक्षेत्र अधिकारी गणेश सोनटक्के यांनी दिली.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त केले जात आहेत. पानखंडा येथील १२ एकरच्य राखीव भूखंडावर बंगले, गोडाऊन, हॉटेल, रिसॉर्ट आदी बांधण्यात आले होते. मात्र यावर हातोडा मारण्यात आला आहे. ही कारवाई यशस्वी करण्यासाठी सहाय्यक वन संरक्षक करिश्मा कवडे, वन परिक्षेत्र अधिकारी गणेश सोनटक्के यांच्या बरोबर कासारवडवली पोलीस, राज्य राखीव दल, येऊर वन विभागाच्या कर्मचारी अधिकारी यांच्या सहकार्याने या अतिक्रमणावर धडक कारवाई करण्यात आली आहे.