म्हाडामधील सुविधा भुखंडावर अतिक्रमण, कॉंग्रेसचा गंभीर आरोप
By अजित मांडके | Published: January 12, 2024 03:36 PM2024-01-12T15:36:45+5:302024-01-12T15:37:03+5:30
येथील सुविधा भुखंडावर अतिक्रमण झाले असून येथील अनेक भुखंड गिळंकृत करण्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
ठाणे : वर्तक भागात म्हाडा वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरु असून याला ठाण्यातील काही बडे राजकीय नेते, पालिका अधिकारी, म्हाडाचे अधिकारी खतपाणी घालत असल्याचा गंभीर आरोप कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केला आहे. येथील सुविधा भुखंडावर अतिक्रमण झाले असून येथील अनेक भुखंड गिळंकृत करण्याचा आरोपही त्यांनी केला आहे. त्यामुळे येथील रहिवाशांना योग्य त्या सोई सुविधा दिल्या नाहीत, आणि येथील भुखंड विकसित केले गेले नाही तर कॉंग्रेस उपोषणाचे हत्यार उपसेल असा इशाराही त्यांनी दिला.
ठाण्यात वर्तक नगर, शिवाई नगर आणि वसंत विहार येथे म्हाडाच्या इमारती आहेत. तर वर्तक नगर भागात चाळी देखील आहेत. परंतु येथील इमरतींचा आणि चाळींचा पुनर्विकास रखडला असल्याचे माहिती त्यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. वर्तक नगर येथे १६ एकरचा म्हाडाचा भुखंड आहे. याठिकाणी १९६० पासून चाळींची आणि इमारतींची बांधणी करण्यात आली. याठिकाणी ७२ इमारती असून १९ च्या आसपास चाळी आहेत.
१९९० मध्ये येथील आरखडा नव्याने मंजुर झाल्यानंतर त्याठिकाणी डीपी रस्ता, शाळा, पोस्ट आॅफीस, हॉस्पीटल आदींसह मुलभुत सोई सुविधा उपलब्ध होतील या अनुषंगाने त्याचे नियोजन आखण्यात आले होते. परंतु त्या सुविधा भुखंडावर किंबहुना राखीव भुखंडावर अतिक्रमण झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. त्यानंतर २००९ मध्ये पुन्हा आराखडा मंजुरीसाठी आला असता, तेव्हा या भागाला अडीच एफएसआय दिला गेला. परंतु हा एफएसआय देत असतांना येथे झालेले अतिक्रमण हटविणे गरजेचे होते. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी त्यानुसार अहवाल तयार करण्यास सांगून काही अटी शर्ती तयार करण्यात आल्या होत्या. परंतु त्यांची देखील अद्याप पुर्तता झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच यातून मार्ग काढण्यासाठी या भागात क्लस्टर योजना आणली जावी अशी मागणी देखील केली होती. परंतु तत्कालीन आमच्या पक्षाचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्याला मान्यता दिली नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
एकूणच आता येथे बडे बिल्डर घुसले असून त्यांची संघटीत टोळी या भागात कार्यरत असून तक्रार करण्यास गेल्यावर पालिकेतील शहर विकास अधिकारी धमकावत असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यामुळे आता या भागात एफएसआयची देखील चोरी झाली असून काही ठिकाणी १५ टक्के अधिकचा एफएसआय देखील वापरला गेला आहे. वहीवाट, मिसिंग लिंक बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे येथील रहिवाशांना न्याय मिळाला नाही तर उपोषणाचे हत्यार पुकारले जाईल असा इशाराही त्यांनी दिला.