सदानंद नाईक, उल्हासनगर : महापालिका पार्किंगचा ताबा व वसुलीचे अधिकार निविदाधारक ठेकेदाराला मिळण्या ऐवजी दुसरेच अवैधपणे पार्किंग वसुली करीत असल्याचा प्रकार उघड झाला. याप्रकाराने महापालिकेचे लाखोंचे नुकसान होत असून गेल्या ३ वर्षांपासून अवैधपणे पार्किंग वसुली होत असल्याचे बोलले जात आहे.
उल्हासनगर महापालिकेने उल्हासनगर पश्चिम रेल्वे स्टेशन व शहाड रेल्वे स्टेशन येथील पार्किंगची निविदा काढुन दोन्ही पार्किंग वसुलीचा ठेका १५ मार्च २०२४ रोजी दिला. ठेकेदाराकडून १४ लाख ५८ हजार व ११ लाख १ हजार ६०० रक्कम ठेक्यापोटी महापालिकेने घेतली. निविदाधारक ठेकेदार दोन्ही पार्किंगचा ताबा घेण्यासाठी गेला असता, पार्किंग ठिकाणी दुसरेच अवैधपणे पार्किंग वसुली करीत असल्याचे उघड झाले. तसेच त्यांनी पार्किंगचा ताबा सोडण्यास मनाई करीत ठेकेदाराला व महापालिका अधिकाऱ्यांना कागदपत्रे मागितल्याचा प्रकार उघड झाला. महापालिका मालमत्ता विभागाचे अधिकारी व अतिक्रमण विभागाचे सहायक आयुक्त व त्यांच्या पथकाने पार्किंग स्थळ पाहणी करून पार्किंगचा ताबा घेण्याचा पर्यंत केला. मात्र राजकीय वरदहस्त असलेल्या खाजगी ठेकेदारापुढे त्यांना नमते घेण्याची वेळ आली आहे.
महापालिकेच्या उल्हासनगर व शहाड रेल्वे स्टेशनसह गोलमैदान, शांतीनगर अश्या एकून ५ पार्किंग ठिकाणाहून, गेल्या ३ वर्षांपासून अवैधपणे वसुली करणाऱ्यामुळे, महापालिकेचे लाखोंचे उत्पन्न बुडीत निघाले. महापालिका पार्किंग जागेवर अतिक्रमण करून अवैधपणे वसुली करणाऱ्यावर सक्त कारवाई करून गुन्हे दाखल करण्याची मागणी सर्वस्तरातून होत आहे. महापालिकेने नियमानुसार ई-निविदा काढूनही अधिकृत ठेकेदाराला पार्किंग वसुली करण्याचा ताबा मिळत नसल्याने, महापालिका इतर मालमत्तेबाबत प्रश्नचिन्हे निर्माण झाले. भविष्यात महापालिका जागेवर असेच अतिक्रमण झाल्यावर, महापालिका आयुक्त, राजकीय नेते, नागरिक बघायची भूमिका घेणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.
जिल्हाधिकाऱ्यांकडे मागितली दाद - आयुक्त अजीज शेख
ऐन निवडणुक आचारसंहितापूर्वी उल्हासनगर व शहाड रेल्वे स्टेशन परिसरातील पार्कींग ई-निविदा काढून ठेका दिला. मात्र पार्किंग जागेचा ताबा देऊन करारनामा करण्याच्या वेळी निवडणूक आचारसंहिता लागली होती. यादरम्यान पार्किंगचा ठेका देता येते का? याबाबत जिल्हाधिकाऱ्याकडे माहिती मागितली आहे.