ठाणे : ठाणे महापालिकेने काही दिवसापासून फूटपाथ आणि रस्ते अडविणाऱ्या फेरीवाल्यांवर सुरू केलेल्या कारवाईअंतर्गत शुक्रवारी शहराच्या विविध भागात हातगाड्या, टपऱ्या व स्टॉलसह अतिक्रमण आणि अनधिकृत शेडवर बडगा उगारला.
या कारवाईअंतर्गत नौपाडा-कोपरी प्रभाग समितीमधील ठाणे स्टेशन रोड, सॅटिस परिसर, गोखले रोड, हरिनिवास सर्कल, तीन हात पेट्रोल पंप, राम मारुती रोड आणि गावदेवी मंदिर परिसरातील चार हातगाड्या, २७ दुकानासमोरील वाढीव भाग तोडला. तर तलाव पाळी, एसटी डेपो, अशोक सिनेमा, प्रभात सिनेमा, जुनी महानगरपालिका, सुभाष पथ, जांभळी नाका व गडकरी रंगायतन या ठिकाणच्या तीन हातगाड्या व २२ दुकानांसमोरील वाढीव भाग तोडला. यासोबतच कोपरीमधील नाखवा हायस्कूल, ठाणेकर वाडी, बारा बंगला, मंगला हायस्कूल तसेच रघुनाथनगर, शहीद मंगल पांडे सेवा रस्ता, आरटीओ ऑफिस व तीन हात नाका येथील पाच हातगाड्या व २३ दुकानांसमोरील वाढीव भाग तोडण्यात आला. कळवा प्रभाग समितीमधील कळवा स्टेशन पूर्व, कळवा भाजी मार्केट, सहकार बाजार, कळवा नाका, खारेगाव मार्केट व पारसिक ९० फूट रोड परिसर या ठिकाणी असणाऱ्या फेरीवाल्यांवर कडक कारवाई करून त्यांचे साहित्य जप्त केले. तर हायलँड रोड ते ढोकाळी नाका, शंकर मंदिर, मनोरमानगर येथील रस्त्याच्या दोन्ही बाजूला रस्त्यावर व पदपथावर असलेले फेरीवाले, अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण हटविले. यामध्ये एकूण आठ लोखंडी टपऱ्या, १३ ताडपत्री शेड, एक पक्के शेड, दोन हातगाड्या, एक लोखंडी गेट निष्कासित केले. तसेच माजीवडा प्रभाग समिती कार्यालय ते कळेशी रोड बाळकूम नाका व बाळकूम पाडा नं. १ येथील पदपथावर ठेवलेले अनधिकृत स्टॉल, पाच टपऱ्या, १३ प्लास्टिक शेड आणि एक फूड स्टॉल तोडला. दिवा-आगासन रस्त्यावरील अनधिकृत फेरीवाले तसेच फूटपाथवरील अतिक्रमण हटवून अनधिकृत शेड तोडण्यात आले.