- सदानंद नाईक उल्हासनगर : महापालिका शाळा क्र-३ राणी लक्ष्मीबाई शाळेवर भुमाफियानी अतिक्रमण केल्याचे उघड झाल्यावर रविवारी शिवसेना रस्त्यावर उतरली. संतप्त शिवसैनिकांनी एकाला मारहाण केली असून महापालिका आयुक्तांच्या कारभारावर टीका होत असून असा आयएएस अधिकारी नको. अशी भूमिका अनेकांनी मांडली आहे. तर सदर शाळा महापालिकेची असून कारवाई करण्याचे संकेत जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांनी दिली.
उल्हासनगर कॅम्प नं- २ परिसरातील बेवस चौक विभागात महापालिकेची शाळा क्र-३, असून शाळेचे नाव राणी लक्ष्मीबाई आहे. मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला शाळा खोल्या असून मोडकळीस व बंद असलेल्या शाळेवर भुमाफियांने १४ ऑगस्टच्या पूर्वसंध्येला महापालिका शाळेवर अतिक्रमण करीत आहेत. अशी माहिती मनसे विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष मनोज शेलार यांना मिळाली. त्यांनीं घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, विरोधी पक्षनेते, सभागृह नेते, महापालिका शिक्षण मंडळ यांना पत्र पाठवून शाळा अतिक्रमणाची माहिती दिली. तसेच सोशल मीडियावर सदर माहिती दिल्यावर एकच खळबळ उडाली. शाळेवर अतिक्रमण झाले. तरी महापालिका व शिक्षण मंडळाला माहिती कशी नाही?. असा प्रश्न विचारला जाऊ लागला. दरम्यान मनसेने आंदोलनाचा इशारा दिल्यावर सत्ताधारी शिवसेना जागी झाली.
शहरात भूमाफिया सक्रिय असून खुल्या जागा, मैदाने, शासकीय कार्यालयाच्या बंद जागा यावर अतिक्रमण केल्याचे प्रकार यापूर्वी घडले आहे. यामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष राजकीय नेते, अधिकारी यांचे संगनमन असल्याने काही एक कारवाई होत नाही. असे आरोप सर्वस्तरातून होत आहे. यापूर्वी महापालिका मुख्यालय समोरील पालिका उद्यानाचे बनावट कागदपत्रं बनवून उद्यान हद्दप करण्याचा प्रकार झाला होता. तर विठ्ठलवाडी पोलिस ठाण्याची पोलिस वसाहतीची सनद प्रांत अधिकारी यांनी चौकशी विना दिल्याने एकच खळबळ उडाली होती. असे अनेक प्रकार शहरात घडल्याने, शहराचे नाव बदनाम झाले आहे.
महापौर लीलाबाई अशान, उपमहापौर भगवान भालेराव, स्थायी समिती सभापती राजेश वधारिया, विरोधी पक्षनेते किशोर वनवारी, सभागृह नेते राजेंद्र चौधरी, महापालिका आयुक्त डॉ राजा दयानिधी सोमवारी काय भूमिका घेतात. याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना शिवसेना शहरप्रमुख व महापालिका सभागृहनेते राजेंद्र चौधरी यांनी शिवसेना नगरसेवक व पदाधिकारी सोबत शालेची रविवारी दुपारी पाहणी केली. त्यावेळी संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी एकाला चोप देवून पिटाळून लावले आहे. तसेच स्थानिक भाजपा नगरसेवकांनी कारवाईची मागणी आयुक्तांकडे केली.
शाळा जागेवरील अतिक्रमण चौकशीची मागणी
महापालिका शाळा इमारतीवर अतिक्रमण झाले असून यामध्ये अधिकारी, राजकीय नेते अप्रत्यक्ष सहभागी असल्याची चर्चा शहरात सुरू आहे. याप्रकारची उच्चस्तरीय चौकशी झाली तर मोठे माशे अडकण्याची प्रतिक्रिया मनसे विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष मनोज शेलार यांनी दिली आहे.