मीरारोड - कोरेगाव-भीमा येथील हिंसाचाराच्या घटनेचे संतप्त पडसाद बुधवारी दिवसभर उमटले आणि सायंकाळी मात्र आरपीआय (आठवले गटा)चे जिल्हा उपाध्यक्ष सुनील शर्मा यांनी चक्क रस्ता अडवून आपला वाढदिवस धुमधडाक्यात साजरा केला. यावेळी अश्लिल भोजपुरी गाण्यांवर नृत्य केली गेली आणि नर्तकींवर पैसे उडवण्यात आले. या संपूर्ण प्रकाराबाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.विविध आंबेडकरवादी संघटना व पक्षांनी जोरदार निषेध करीत बुधवारी राज्यभर बंद पुकारला होता. बंदला ठिकठिकाणी हिंसक वळण लागले. मीरा भाईंदरमध्ये देखील ठिकठिकाणी रास्ता रोको करण्यात आला. आंबेडकरी जनता दलितांवर झालेल्या अन्यायाविरुद्ध एकीकडे संताप व्यक्त करीत असताना दुसरीकडे मीरा-भार्इंदरमध्ये आरपीआय आठवले गटाचे जिल्हा उपाध्यक्ष शर्मा यांनी आपला वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा केला.भाईंदर पश्चिमेच्या स्मशानभूमी समोरील नारायणा शाळेजवळचा रस्ता अडवून वाढदिवसाच्या कार्यक्रमाकरिता स्टेज बांधण्यात आला होते. त्याच ठिकाणी शर्मा यांचे कार्यालय आहे. रात्री अश्लील भोजपुरी गाण्यांवर अश्लील नृत्य करण्यात आले. या वेळी जमलेले कार्यकर्ते तसेच नागरिक नर्तकींवर पैशांची उधळण करीत होते. रात्री उशीरापर्यंत हा धागडधिंगा सुरु असल्याचे परिसरातील काही रहिवाशांनी सांगत संताप व्यक्त केला. मुलांच्या शाळा व परीक्षा सुरु असताना या अश्लील नाच-गाण्याच्या कार्यक्रमामुळे विद्यार्थी, पालक यांना मन:स्ताप झाला.या कार्यक्रमाकरिता ध्वनिक्षेपकाची, महापालिकेची तसेच वाहतूक पोलिसांकडून कोणतीच परवानगी घेण्यात आली नसल्याचे सूत्रांनी सांगीतले.नवघर पोलिसांनी सावरकर चौकात रास्ता रोको व भार्इंदर पूर्व भागात रॅली काढल्या प्रकरणी ४८ आंदोलकां सह अन्य १२५ ते १५० जणांच्या जमावाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या मध्ये शिवसेना नगरसेवक अनंत शिर्के, सुनील भगत, उत्तम नाईक, अनिल भगत, फारुक कुरेशी, अमिता दारशेकर, त्रिशला ढाले, रिपब्लिकन पक्षाचा सुनील शर्मा यांचा समावेश आहे.शर्मा हे रिक्षा संघटनेचे पदाधिकार असून त्यांनी अश्लील नाचगाण्याचा कार्यक्रम ठेवल्याची आपल्याला कल्पना नव्हती. वरिष्ठांशी बोलून त्यांच्यावर कारवाई करु.-देवेंद्र शेलेकर, जिल्हाध्यक्ष, आरपीआय आठवले गटहा अतिशय संतापजनक व लाजीरवाणा प्रकार आहे. त्याचा मी निषेध करतो. शर्मा यांना आंबेडकरवादी चळवळीचा गंध नसून फक्त स्वार्थासाठी ही लोकं पक्षात येतात. त्यामुळे चळवळ व समाजास बदनाम करतात.- सुनील भगत,भारिप, जिल्हाध्यक्षदलितांवरील अत्याचाराच्या घटनेमुळे समाजात संताप व्यक्त होत असताना परिस्थितीचे भान सर्वांनीच राखले पाहिजे. दलित चळवळीला काळीमा फासणाºया अशा प्रवृत्तींचा निषेध करावा तेवढा थोडा आहे.- संगीता धाकतोडे, संत रोहिदास बहुउद्देशिय सामाजिक संस्था
बंदनंतर रिपाइं उपाध्यक्ष झाले जल्लोषात दंग, अश्लील गाण्यांवर उधळल्या नोटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2018 6:33 AM