ठाणे : महाआघाडीबाबत येत्या आठ दिवसांत शिक्कामोर्तब होईल. त्यात ८ ते ९ पक्ष असतील पण, मनसे आणि एमआयएम नसतील, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व खासदार अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी ठाण्यात पत्रकार परिषदेत दिली. तसेच २० फेब्रुवारीपर्यंत राज्यात काँग्रेसच्या ५० सभा होणार असल्याचे जाहिर केले.जनसंघर्ष यात्रेनिमित्त जाहिर सभा झाल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जनसंघर्ष यात्रा आता संपली असली तरी संघर्ष सुरूच राहणार आहे. तसेच ज्या ५० सभा होणार आहेत त्या जनसंघर्ष यात्रेतील सभा जेथे झाल्या नाहीत त्या ठिकाणी होणार आहेत. आगामी निवडणुकीतही त्या होतील असेही त्यांनी सांगितले.जनसंघर्ष यात्रा सहा टप्प्यात पूर्ण झाली आहे. कोल्हापुरातून या यात्रेला सुरुवात झाली. या यात्रेने ६ हजार ५४० किलो मीटर प्रवास करताना मुंबई वगळता उर्वरीत राज्यातील २३७ तालुक्यात तसेच १२० विधानसभा मतदार संघात जाहीर सभा घेत त्या-त्या ठिकाणच्या परिस्थितीचा आढावा घेऊन लोकांशी चर्चा केली आहे.भारिपचे प्रकाश आंबेडकर यांच्याशी तीन वेळा महाआघाडीबाबत भेट झालीे. महाआघाडीत आंबेडकरही असतील, असे स्पष्ट करून इतर पक्षांशीही चर्चा झाल्याच ते म्हणाले. तसेच लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र लागल्यास आम्ही तयार असल्याचेही त्यांनी सांगितले.
महाआघाडीवर जानेवारी अखेरीस शिक्कामोर्तब - अशोक चव्हाण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2019 4:48 AM