ठाणे : गेल्या विधानसभा निवडणुकीच्या आधी ठाणे महापालिकेच्या माध्यमातून ‘आपला दवाखाना’ ही संकल्पना ठाण्यात रुजवली. काही नगरसेवकांनी या संकल्पनेला विरोध केला असला तरी येत्या मार्चपर्यंत सामान्यांसाठी ५० आपला दवाखाना सुरू करण्याचे प्रयत्न झाले आहेत. येत्या फेब्रुवारीपर्यंत २५ वे क्लिनिक सुरू करण्याचे नियोजन असल्याचेही आपला दवाखाना आणि वन रुपी क्लिनिकचे संचालक डॉ. राहुल घुले यांनी सांगितले. तर ज्या नगरसेवकांना आपल्या प्रभागात अशाप्रकारे आपला दवाखाना सुरू करायचा असेल त्यांना महापालिका आयुक्तांशी पत्रव्यवहार करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेनुसार आपला दवाखाना हे क्लिनिक ठाण्यात सुरू झाले. दीड महिन्यापासून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. ठाण्यात ५० क्लिनिक सुरू करण्यासाठी महापालिका प्रशासनाने परवानगी दिली आहे. त्यातील अवघे पाच क्लिनिक दीड वर्षात सुरू झाले होते. त्यामुळे यावरून टीका सुरू होती.
आता आपला दवाखाना याचा कारभार मॅजिक दिल या संस्थेच्या वन रुपी क्लिनिकने हाती घेतला आहे. कमी वेळेत क्लिनिक सुरू केल्याने संख्या पाचवरून आठवर गेली आहे. तसेच येत्या ४ फेब्रुवारीला २५ वे क्लिनिक सुरू करण्याचे नियोजन केले आहे. सध्या ठाणे शहरातील कोपरी, राबोडी, लोकमान्यनगर, सावरकरनगर, किसननगर आदी ठिकाणी क्लिनिक सुरू असून लवकरच मुंब्रा येते तीन, कळव्यात दोन, दिवा येथे चार ठिकाणी हे दवाखाने सुरू होतील. त्याचा लाभ सामान्यांना होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
महापालिकेने ठाण्यात ५० आपला दवाखाना सुरू करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. त्यानुसार येत्या ४ फेब्रुवारीला २५ वे क्लिनिक सुरू करण्याचे नियोजन केले आहे. उर्वरित मार्च अखेरपर्यंत सुरू होतील. जर नगरसेवकांना आपल्या प्रभागात क्लीनिक सुरू व्हावे असे वाटत असेल तर त्यांनी आयुक्तांकडे मागणी करावी. - डॉ. राजू मुरुडकर, मुख्य वैद्यकीय अधिकारी, ठामपा.