लोकमत न्यूज नेटवर्ककर्जत : नेरळ येथून माथेरानकडे जात असताना मिनिट्रेनच्या इंजिनात बिघाड झाला. शिवाय इंजिन रुळावरून खाली घसरल्याने एक प्रवासी गाडी रद्द करण्यात आली. यामुळे पर्यटकांचे प्रचंड हाल झाले. त्यावेळी त्या मिनिट्रेनमध्ये ८० प्रवासी होते. त्या प्रवाशांना मध्य रेल्वेने त्यांच्या तिकिटांचे पैसे परत देण्याचा निर्णय घेतला. तशा सुचनाही देण्यात आल्या.
नेरळ माथेरान नेरळ ही गाडी दुपारी साडेबारा वाजता वॉटर पाईप स्टेशन येथे पोहचली. ती मिनिट्रेन घेऊन जाणारे इंजिन रुळावरून घसरले. रुळावरून इंजिन उतरले की गाडी उचलण्यासाठी किमान दोन तासांचा कालावधी लागतो. त्यामुळे मध्य रेल्वे प्रशासनाने त्या गाडीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या तिकिटाचे पैसे परत देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सर्व प्रवाशांनी वॉटर पाईप स्टेशन बाहेर येऊन नेरळ-माथेरान प्रवासी टॅक्सी मधून माथेरान मध्ये पोहोचले.
रात्री नऊ वाजता गाठले नेरळ
रुळावरून उतरलेल्या मिनिट्रेनचे इंजिन सव्वा तीन वाजता उचलण्यात आले. त्यानंतर ५२१०५ ही गाडी वॉटर पाईप स्थानकातून नेरळ करिता सोडण्यात आली. कोणत्याही प्रवाशाविना वॉटर पाईप स्थानकातून निघालेली ती मिनिट्रेन पुन्हा एकदा जुम्मापट्टी स्थानकात थांबविण्यात आली. तर माथेरान स्थानकातून नेरळ करिता दुपारी दोन वाजून ३५ मिनिटांनी सोडली जाणारी मिनिट्रेनची फेरी रद्द केली. वॉटर पाईप स्थानकातून दुपारी तीन वाजून वीस मिनिटांनी नेरळकडे रवाना झालेली मिनी ट्रेन नेरळ स्थानकात रात्री नऊ वाजता पोहोचली.