ठाणे, दि. 13 - लोकलमध्ये गर्दीत चढताना मोबाइल चोरणा:या दोन चोरट्यांना पकडून कल्याणमधील एका इंजिनीअरने जीव धोक्यात घालून ठाणे लोहमार्ग पोलिसांच्या हवाली केले. ही घटना मंगळवारी ठाणे रेल्वे स्थानकात घडली. सध्या लोकलमध्ये मोबाइल चोरट्यांना सुळसुळाट सुरू आहे. परंतु, इंजिनीअरच्या या धाडसामुळे अशा घटनांत चोरट्यांना चपराक बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, त्या चोरटय़ांकडून यापूर्वीचे तीन गुन्हे उघडकीस आले असून यासह चार गुन्ह्यांतील चार मोबाइल फोन जप्त केले आहेत. तसेच ते सराईत चोरटे असल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांनी दिली.
कल्याण येथे राहणारे तक्रारदार व सिव्हिल इंजिनीअर चंद्रमुनी वाहुळे (30) हे मंगळवारी ठाण्यात काही कामानिमित्त आले होते. याचदरम्यान, घरी परतताना, ते ठाण्यातील फलाट क्रमांक-2 येथून कल्याण स्लो लोकलच्या जनरल डब्यात चढताना, झालेल्या गर्दीत अटकेतील भिवंडीतील फजले खान (22) या चोरटय़ाने त्यांचा मोबाइल चोरण्याचा प्रयत्न केला.
याचदरम्यान, ते वाहुळे यांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ चोरट्यास पकडले. या वेळी झालेल्या गोंधळात खान, त्याचा साथीदार सुरज मंगळ सिंग (25 रा. भिवंडी) यालाही पोलीस आणि प्रवाशांनी पकडून दोघांना लोहमार्ग पोलिसांच्या हवाली केले. याप्रकरणी त्या दोघांवर ठाणो लोहमार्ग पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. ते दोघे सराईत गुन्हेगार असून त्यांना रेल्वे न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम सोनावणे यांनी दिली.