- नितिन पंडीतभिवंडी - तालुक्यातील बोरपाडा परिसरात तयार होत असलेल्या अंबिका सिटी या गृह प्रकल्पाच्या इमारतीच्या आठव्या मजल्यावरून पडून तरुण अभियंत्याचा दुर्दैवी मृत्यू झालाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी घडली आहे. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मात्र विकासकाने कामगारांच्या सुरक्षेची कोणतीही व्यवस्था केली नसल्यानेच आपल्या मुलाच्या मृत्यू झाला असल्याने विकासकावर गुन्हा दाखल करण्यात यावा असा आरोप व मागणी मयत अभियंत्यांच्या नातेवाईकांनी केली आहे.
मोहम्मद आमीन मोहम्मद मुस्तकीम अन्सारी ( वय २७ वर्ष ) असे मयत साईड अभियंताचे नाव आहे . मयत मोहम्मद आमीन हा तालुक्यातील बोरपाडा परिसरात मुंबईतील एका बांधकामव्यवसायिकाच्या वतीने बनविण्यात येणाऱ्या उच्चभ्रू अंबिका सिटी गृह प्रकल्पात साईड अभियंता म्हणून कार्यरत होता. शनिवारी कामाची पाहणी करतांना इमारतीच्या आठव्या मजल्यावरून त्याचा तोल जाऊन खाली पडल्याने जागीच मृत्यू झाला. या घटने नंतर मयताच्या वडिलांनी विकासकावर हलगर्जीपणाचा आरोप लावला असून याठिकाणी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोणत्याही प्रकारची काळजी न घेण्यात आल्यामुळे ही दुर्घटना घडली असल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केला असून दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात यावी , तसेच जोपर्यंत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काळजी घेतली जात नाही तोपर्यंत हे काम बंद करावे अन्यथा इतरांचेही जीव जाण्याची दाट शक्यता वर्तविली आहे . या घटनेची नोंद भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.