लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी दहावीनंतरच्या अभियांत्रिकी पदविका प्रथम वर्षाची केंद्रीय ऑनलाइन प्रक्रिया ३० जूनपासून सुरू झाली आहे. याकरीता प्रवेश इच्छुक विध्यार्थी http://poly21.dtemaharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन (दहावीचा निकाल लागण्यापूर्वीसुद्धा) अर्ज नोंदणी करू शकतात. ठाणे जिल्ह्यातील पदविका अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेसाठी शासकीय तंत्रनिकेतन ठाणे येथील संस्थेचे प्राचार्य डॉ. एन. एन. म्हाला यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली असून, ते जिल्ह्यातील अभियांत्रिकी पदविका प्रवेश प्रक्रियेबाबत विविध सुविधा केंद्रांना मार्गदर्शन करणार आहेत. प्रवेश प्रक्रियेच्या ऑनलाइन प्रणालीद्वारे विद्यार्थी, संगणकावर किंवा अँड्रॉइड मोबाइलद्वारे नोंदणी करू शकतात. नोंदणीनंतर कागदपत्रे तपासणीसाठी ई -स्क्रुटिनी आणि प्रत्यक्ष स्क्रुटिनी असे दोन पर्याय उपलब्ध दिलेले आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे ही सुविधा उपलब्ध नाही ते प्रत्यक्ष तपासणी या दुसऱ्या पर्यायाअंतर्गत सुविधा केंद्रावर नोंदणी अर्ज भरून वेळापत्रकाप्रमाणे कागदपत्रांची तपासणी करू शकतील. शासकीय तंत्रनिकेतन मुंब्रा, ठाणे येथे मार्गदर्शन व समुपदेशन केंद्राची स्थापना केली असून, यामध्ये प्रवेश प्रक्रियेसह विविध शाखांची माहिती व लागणारे कागदपत्रे तसेच संस्थेमध्ये उपलब्ध सोयीसुविधा बद्दल मार्गदर्शन केले जाईल, असे म्हाला यांनी सांगितले.