ठाणे : जिल्हा परिषदेने गेल्या काही वर्षांपासून भिवंडी व मुरबाड येथे इंग्रजी माध्यमाच्या पाच बालवाड्या (नर्सरी) सुरू केल्या आहेत. मात्र, त्या तत्काळ बंद करण्याचे राज्य शासनाचे आदेश आहेत. त्यास न जुमानता या बालवाड्या गोरगरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी सुरू ठेवण्यास ठाणे जिल्हा परिषदेने प्राधान्य दिले आहे.जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या वाढवण्याच्या दृष्टीने इंग्रजी माध्यमाची बालवाडी उत्तम माध्यम असल्याचे सांगितले जात आहे. या इंग्रजी माध्यमाच्या बालवाडीत शिक्षण घेतलेला विद्यार्थी अन्य इंग्रजी शाळेत न जाता तो पुढील शिक्षणही जिल्हा परिषदेच्या शाळेत घेत असल्याचे वास्तव निदर्शनात आल्याचे सदस्यांकडून सांगितले जात आहे.त्यामुळे राज्य शासनाने या इंग्रजी माध्यमाच्या बालवाड्या बंद करण्याचे आदेश दिले असले तरी त्या अद्यापही सुरू असल्याचे दिसून येत आहे.बालवाड्यांसाठी सेस फंडाचा वापरबालवाड्यांवर होणारा खर्च हा शासनाकडून न घेता जिल्हा परिषदेच्या सेस निधीतून केलाजात आहे. यामुळे शासनाने बंद करण्याचे आदेश दिलेले असले तरी त्या सुरू ठेवण्यास जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीने संमती दिल्यामुळे या इंग्रजी माध्यमाचे बालवाडी केंद्र सुरू ठेवले आहेत.भिवंडी तालुक्यासह मुरबाड येथे या पाच बालवाड्या सुरू असून त्यास विद्यार्थ्यांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. गरीब कुटुंबातील विद्यार्थ्याना महागड्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शिक्षण शक्य नाही. यावर मात करण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून या बालवाड्या सुरू आहेत.पण त्या बंद करण्याचे आदेश एक महिन्यापूर्वी शासनाने जारी केले. पण त्यास न जुमानता या बालवाडी केंद्रात विद्यार्थी शिक्षण घेत असल्याच्या वृत्तास जिल्हा परिषदेच्या ज्येष्ठ सदस्यांकडून दुजोरा देण्यात आला आहे.
शासन आदेश न जुमानता जि.प.च्या इंग्रजी नर्सरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2019 12:54 AM