मीरारोड - भाईंदर पश्चिम ते वसई किल्ला अशी खाडी मार्गे रो रो सेवेचा शुभारंभ मंगळवार पासून करण्यात आला. रो रो सेवे मुळे भाईंदर व वसई किनारपट्टी असा प्रवास वाहने घेऊन करत येणार असून पहिल्याच दिवशी लोकांमध्ये या सेवेबद्दल उत्साह दिसून आला. निसर्गाचा आनंद घेत वेळेची आणि इंधनाची बचत करत रो रो सेवेचा प्रवास करा असे आवाहन खासदार राजन विचारे यांनी यावेळी उदघाटन प्रसंगी नागरिकांना केले .
रस्ते मार्गाने होणारी वाहनकोंडी आणि लांबचा वळसा घालून करावा लागणारा प्रवास यातून नागरिकांची सुटका व्हावी म्हणून मीरा भाईंदर , वसई विरार सह ठाणे , कल्याण डोंबिवली , नवी मुंबई आदी महापालिकांना खाडी मार्गाने रो रो सेवेने जोडण्याची मागणी खासदार राजन विचारे यांनी चालवली होती. त्यातील भाईंदर पश्चिम धक्का ते वसई किल्ला अशी रो रो सेवा सुरु करण्यास २०१६ साली मंजुरी मिळाल्याचे मेरी टाइम बोर्डाने खा . विचारे यांना कळवले होते . भाईंदरची जेट्टी बांधून पूर्ण झाली पण वसई जेट्टीचे काम परवानग्यां अभावी रखडल्याने रो रो सेवा सुरु होण्यास विलंब झाला.
मंगळवार २० फेब्रुवारी रोजी पासून रो रो सेवा प्रायोगिक तत्वावर सुरु करण्याचा निर्णय झाला . त्यानुसार मंगळवारी सकाळी भाईंदर जेट्टी येथे जानव्ही तर वसई जेट्टी येथे वैभवी ह्या फेरीबोट सेवा देण्यास सज्ज झाल्या. वसई येथून सकाळी ९. ०५ च्या सुमारास भाईंदर कडे जाण्यास वैभवी हि फेरी बोट सोडण्यात आली . या बोटीत आमदार क्षितिज ठाकूर सह बविआ , भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक यांनी प्रवास केला.
बोट भाईंदर जेट्टी येथे आली असता भाजपच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरु केली . त्याला प्रत्युत्तर म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने घोषणा दिल्या . आ . क्षितिज ठाकूर हे वाहनाने बोटीतून बाहेर पडले . त्या नंतर वैभवी बोट पुन्हा वसईच्या दिशेने रवाना झाली . त्या नंतर जानव्ही फेरी बोटीवर खा . विचारे यांच्या हस्ते रो रो सेवेचा फीत कापून व श्रीफळ वाढवून औपचारिक उदघाटन करण्यात आले . खा . विचारे सह शिवसेना पदाधिकारी व उपस्थित नागरिक यांनी फेरीबोटीने वसई किनाऱ्या पर्यंत प्रवास केला . या वेळी रो रो सेवा चालवणारे मेसर्स सुवर्णदुर्ग शिपीग अँड मरीन सर्व्हिसेस प्रा.लि. ह्या कंपनीचे अध्यक्ष डॉ . चंद्रकांत मोकल व कार्यकारी अध्यक्ष डॉ . योगेश मोकल उपस्थित होते.
फेरीबोटी ने वाहन घेऊन प्रवास करण्याची नागरिकां मध्ये उत्सुकता व उत्साह दिसून आला . अनेक नागरिक आपली दुचाकी , रिक्षा , कार अशी वाहने घेऊन फेरी बोट मधून प्रवास करण्यासाठी आले होते . वसईच्या पापडी येथील रिक्षा चालक बाळू महालुंगे हे त्यांच्या पत्नीस रिक्षाने मीरारोड येथील रुग्णालयात नेण्यासाठी रो रो सेवा घेण्यास आले होते . रस्ते मार्गाने महामार्गावरून वळसा घालून जावे लागत होते . बोटीतून निसर्गाचा आनंद घेत प्रवास करताना बाळू व त्यांच्या पत्नी यांनी एकमेकांचे फोटो घेतले.
भाईंदर - वसई रो रो सेवा सुरु करण्यासाठी जवळपास ९ वर्षांच्या अथक प्रयत्नांना आज यश आल्याचे खा . विचारे म्हणाले . नागरिकांचा प्रवास अधिक सुखकर होणार वेळ , इंधन वाचेल . निसर्गाचा आनंद अनुभवता येणार आहे . पर्यटनाला सुद्धा चालना मिळणार आहे . त्यामुळे नागरिकांनी रो रो सेवेचा वापर करावा असे आवाहन खा . विचारे यांनी यावेळी केले . भाईंदर ते ठाणे , डोंबिवली , नवी मुंबई आदी शहरे सुद्धा लवकरच रो रो मार्गाने जोडली जातील असे ते म्हणाले . रो रो सेवा सुरु करतेवेळी महाराष्ट्र सागरी मंडळाचे कार्यकारी अभियंता अजित मोहिते व तुषार पाटोळे, उपअभियंता प्रशांत सानप , प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन सूरज नाईक आदी उपस्थित होते . भाईंदर - वसई असा फेरीबोटीने प्रवास करण्यास सुमारे १५ ते २० मिनिटे लागत आहेत . सध्या एकच फेरीबोट रो रो सेवेसाठी वापरली जाण्याची शक्यता आहे .
असे आहे वेळापत्रक :
भाईंदर वरून वसईला जाण्यासाठी सकाळी पहिली बोट ७ . ३० वा . सुटेल . नंतर ९ . ३० ; ११ . १५ ; दुपारी १२ . ४५ ; ३ . ०० ; ४ . ३० ; सायंकाळी ६ व शेवटची बोट ७ . ३० वाजता सुटेल .
वसई वरून भाईंदरला जाण्यासाठी पहिली बोट सकाळी ६ . ४५ वा . सुटेल . नंतर सकाळी ८ . १५ ; १० . ३० ; १२. ०० ; दुपारी २ . १५ ; ३ . ४५ ; सायंकाळी ५ . १५ व शेवटची बोट ६ . ४५ वाजता सोडण्यात येणार आहे .