ठाणे - राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, वास्तुशास्त्र, हॉटेल व्यवस्थापन आदी अभ्यासक्र मांची प्रवेशप्रक्रि या उच्च व तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत राबवावी, अशी आग्रही मागणी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी लावून धरली आहे.राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाची प्रवेशप्रक्रिया खाजगी संकेतस्थळामार्फत राबवण्यात येत होती. मात्र, या कंपनीच्या सर्व्हरवरील भार वाढल्यामुळे प्रवेशप्रक्रिया मंदावली होती. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी भरलेली माहिती संलग्नित करताना तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. या प्रकारांमुळे सदोष माहितीच्या आधारावर गुणवत्ता यादी जाहीर केल्यानंतर विद्यार्थ्यांवर अन्याय होण्याची भीती होती. या पार्श्वभूमीवर प्रवेश नियामक प्राधिकरणाने नोंदणीला स्थगिती दिली. याकडे डावखरे यांनी लक्ष केंद्रित करून उच्च व तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत प्रवेशप्रक्रिया राबवण्याची मागणी शुक्रवारी तावडे यांच्याकडे केली.अभियांत्रिकीसह व्यावसायिक अभ्यासक्रमांच्याप्रवेशप्रक्रि येबाबत उच्च व तंत्रशिक्षण संचालनालयाला परिपूर्ण तांत्रिक माहिती आहे. यापूर्वीच्या प्रवेशप्रक्रिया या संचालनालयाकडून पार पाडण्यात आल्या आहेत. या पार्र्श्वभूमीवर अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्रासह व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया उच्च व तंत्रशिक्षण संचालनालयाकडे सोपवणेच योग्य ठरेल, असे डावखरे यांनी स्पष्ट करून तावडे यांचे या प्रवेशप्रक्रियेकडे लक्ष वेधले आहे. यावरून तावडे आता काय निर्णय घेणार, याकडे राज्यभरातील विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.
तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत प्रवेश व्हावेत, विनोद तावडे यांना साकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2019 1:20 AM