लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : कोरोनाचा वाढता प्रसार पाहता राज्य सरकारने गुरुवारी रात्री ८ वाजेपासून अधिक कडक निर्बंध लागू केलेत. लोकलमध्ये अत्यावश्यक सेवा म्हणजेच शासकीय कर्मचारी, वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित कर्मचाऱ्यांनाच प्रवास करता येणार असून, सर्वसामान्यांना लोकल प्रवास करण्यास मनाई आहे. त्या पार्श्वभूमीवर कल्याण आणि डोंबिवली या दोन्ही रेल्वेस्थानक परिसरात शुक्रवारी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. ओळखपत्र पाहूनच नागरिकांना रेल्वेस्थानकात प्रवेश दिला जात होता.
कल्याण रेल्वेस्थानकावर फक्त तीन ठिकाणांहून प्रवेश देण्यात येत होता. प्रत्येक प्रवेशद्वारावर पोलिसांचा फौजफाटा तैनात होता. तिकीट काउंटरवरदेखील ओळखपत्र दाखवणे बंधनकारक करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांत सामान्य नागरिकांना रेल्वेस्थानकात प्रवेश दिला जात होता. मात्र, आता नियम अधिक कडक केल्यामुळे अनेक नागरिकांना रेल्वेस्थानकातून घरी परतावे लागले.
-------------
खासगी बँक कर्मचाऱ्यांना रेल्वेस्थानकात प्रवेश न मिळाल्याचे सांगण्यात आले. त्या कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत रेल्वे प्रवासाकरिता परवानगी हवी, बँका अर्थव्यवस्था सांभाळतात हे राज्य शासन, रेल्वे यांना मान्य नाही का, असा सवाल उपस्थित केला.
......
वाचली