भिवंडी : भिवंडी लोकसभा मतदारसंघातील भिवंडी पूर्व, पश्चिम, ग्रामीण,शहापूर, मुरबाड व कल्याण पश्चिम या सहाही विधानसभा मतदार क्षेत्रात नागरिकांनी उत्साहात मतदान केले. रणरणत्या उन्हातदेखील नागरिकांनी लांबच लांब रांगा लावून आपला मतदानाचा हक्क बजावला. अनेक नागरिकांची नावे मतदार यादीतून वगळल्याने अनेक मतदारांचा हिरमोड झाला. काही भागांत बोगस मतदान होत असल्याच्या तक्रारीवरून महायुतीचे उमेदवार कपिल पाटील हे संतप्त झाले. मागील निवडणुकीत भिवंडीत ५३.०५ टक्के मतदान झाले होते. यावेळी सायंकाळी पाच वाजेपर्यंत ४९.४३ टक्के मतदान झाले होते. त्यामुळे भिवंडीत मागील वेळेपेक्षा जास्त मतदान होण्याची चिन्हे दिसत आहेत.भिवंडी लोकसभेतील महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश म्हात्रे ऊर्फ बाळ्या मामा, भाजपचे कपिल पाटील व अपक्ष नीलेश सांबरे त्यांच्यात लढत होती. पहिल्या दोन तासांत अवघे ४.८६ टक्के मतदान झाले. मात्र दुपारनंतर मतदानाचे प्रमाण वाढले. अनेक मतदान केंद्रांवर रांगा लावून लोकांनी मतदान केले. शेवटच्या एका तासात सर्वच मतदार केंद्रांवर मतदारांनी मोठी गर्दी केली होती.यादीतून नावे गायबभिवंडी मतदारसंघातही अनेक मतदारांची नावे यादीतून गायब असल्याच्या तक्रारी मतदारांनी केल्या. गेली ३० वर्षे मतदान करीत होतो अचानक नावे कशी गायब झाली, असा सवाल नावे गायब झालेले शिक्षक, ज्येष्ठ नागरिक, महिलाांनी केला.
बोगस मतदानाचा आरोपउमेदवार कपिल पाटील यांनी शहरातील बाळा कंपाऊंड येथील मतदान केंद्रांवर बोगस मतदान होत असल्याचा आरोप केला. ईदगा येथे पाटील पोहोचले असता काही ठिकाणी रसायनांचा वापर करून बोटावरील शाई पुसून लोक मतदान करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. पाटील व त्यांच्या समर्थकांनी याला आक्षेप घेताच नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतला. त्यामुळे पाटील यांनी तेथून काढता पाय घेतला. पाटील यांचा हा आक्षेप विरोधी उमेदवार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी फेटाळला व पाटील यांच्या आरोपांचा तीव्र शब्दांत निषेध केला.तृतीयपंथींचे मतदानभिवंडी परिसरात तृतीयपंथी व देहविक्रय करणाऱ्या महिलांनी मोठ्या संख्येने मतदान केले.