लाेकमत न्यूज नेटवर्क
भातसानगर : गतवर्षी काेराेनाच्या पार्श्वभूमीवर कडक नियम असल्याने बहुतांश लोकांनी साधेपणाने घरीच सण साजरा केला होता. अनेकांनी नातेवाईकांना दर्शनासाठी आमंत्रणेही दिली नाहीत. त्यामुळे गणेशभक्तांच्या उत्साहावर विरजण पडले हाेते. मात्र, यंदा निर्बंध शिथिल झाल्याने हा गणेशाेत्सव दणक्यात साजरा करण्याच्या इराद्यानेच ग्रामस्थ बाहेर पडत आहेत. मात्र, ग्रामीण भागातील हा उत्साह घातक ठरू नये म्हणजे मिळवले, अशीच काहीशी शंका बाजारांतील गर्दी पाहून मनात डाेकावत आहे.
गणेशाेत्सव ताेंडावर आल्याने शहापूर तालुक्यातील वासिंद, शेणवे, अघई, कसारा, डोळखांब, आटगाव, भातसानगर, बिरवाडी, किन्हवली आणि शहापूर या महत्त्वाच्या बाजारपेठा ग्राहकांच्या गर्दीने फुलून गेल्या आहेत. विशेष म्हणजे, लहान मुलांना बराेबर घेऊन ही खरेदी केली जात आहे. दोन्ही लाटांच्या परिणामांच्या जखमा अजूनही ओल्या आहेत. तरीही ही बेफिकिरी सुरू असल्याने चिंता वाढली आहे.
महागाईचा फटका सर्वसामान्यांना बसला आहे. पूजेचे साहित्य मागील वर्षापेक्षा दीडपटीने वाढले आहे. मागील वर्षी हे साहित्य सातशे रुपयांपर्यंत घेतले होते. यावर्षी ते साहित्य घ्यायला १२०० रुपये मोजावे लागले असल्याचे ग्राहक किसन गाडेकर यांनी सांगितले. त्यात भरीस भर म्हणजे त्यासाठी लागणाऱ्या सजावटीच्या साहित्याच्या किमती वाढल्या आहेत. कागदी व प्लास्टिकच्या माळा, झुंबरे, लायटिंग यांच्या किमती भरमसाट वाढल्या आहेत. मात्र, निर्बंध शिथिल झाल्याने बाजारात प्रचंड गर्दी उसळत आहे. त्यामुळे गणेशाेत्सव काळात काेराेना रुग्णांची संख्या वाढण्याची भीती असून हा काळ परीक्षेचा ठरणार आहे.
मूर्ती महागल्या
गणपतीच्या मूर्ती बनविण्यासाठी मूर्तिकारांची हातघाई सुरू आहे. शाडूची मूर्ती बनविण्यासाठी दीड ते दोन दिवस इतका कालवधी लागताे. तीन फूट उंचीच्या मूर्तीसाठी हजार रुपयांची माती लागते. तर सजावटीसाठी ३०० रुपयांचा खर्च येताे. ही मूर्ती तीन हजारांपर्यंत विकली जाते, असे मूर्तिकार बुधाजी दहीलकर यांनी सांगितले. बाजारात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती आल्याने मातीच्या मूर्ती विक्री करताना दमछाक हाेते. बाजारात मिळणाऱ्या सजावटीच्या वस्तू, वाहतूक आणि कच्चा माल महागल्यामुळे मूर्ती महागल्या आहेत.
काेट
'मागील तीन-चार वर्षांपेक्षा यावर्षी सजावटीचे सर्व साहित्य दुपटीने महागले आहे. काय घ्यावे हेच समजत नाही. साध्या पद्धतीने सजावट करणेच योग्य ठरेल.
- गणेश पंडित, ग्राहक
------
कोरोना महामारीच्या आधीच्या काळात धंद्यात मजा होती. ती आता राहिली नाही. आता दुकानात येणाऱ्या प्रत्येकाच्या सुरक्षिततेची जबाबदारी आपण घेऊ शकत नाहीत. साहित्याचे दरही वाढले आहेत.
- श्याम डिगोरे, व्यापारी