ठाणे : ठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने भिवंडीच्या दिवा अंजूर व शहापूरच्या शेंद्रुण आरोग्य केंद्रांवर शनिवारपासून १८ ते ४४ या वयोगटांतील तरुणांसाठी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू केले. त्यास तरुणांनी उत्तम प्रतिसाद दिला.
ऑनलाइन बुकिंग केलेल्या लाभार्थ्यांचेच लसीकरण करण्यात येत आहे. इतर नागरिकांना लसीकरण केंद्रावर गर्दी करण्यास मनाई करण्यात आली आहे. यामुळे कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करणे शक्य होत आहे. ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रूपाली सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली तरुणांच्या या लसीकरणाला शनिवारपासून प्रारंभ झाल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनीष रेगे यांनी सांगितले.
लसीकरणाचे लाभार्थी नसलेल्या इतर नागरिकांनी या केंद्रांवर गर्दी करू नये, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष सुषमा लोणे, उपाध्यक्ष सुभाष पवार, आरोग्य व बांधकाम समिती कुंदन पाटील यांनी केले आहे. या १८ ते ४४ वयोगटांतील लाभार्थ्यांनी लसीकरणासाठी या www.cowin.gov.in या वेबसाइटवर ऑनलाइन बुकिंग करायचे आहे. स्वतःची माहिती, मोबाइल नंबरद्वारे नाव रजिस्टर करून ओळखपत्र आणि इतर माहिती भरून लसीकरणासाठी डॉक्टरांची वेळ प्राप्त करणे आवश्यक आहे. स्वतःच्या मोबाइलवर वेळ कळल्यानंतरच लाभार्थ्यांनी केंद्रावर उपस्थित होणे आवश्यक आहे. या बुकिंगसाठी वापरलेले फोटो, ओळखपत्र घेऊन आलेल्यांचेच लसीकरण करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ. अंजली चौधरी यांनी दिली.
........
वाचली