ठाणे : लॉकडाऊनमध्ये एका स्टँडअप कॉमेडियनने छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला आणि या व्हायरल झालेल्या व्हिडिओवर शिवभक्तांनी तीव्र शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या. अगदी खळखटॅकपर्यंत भावनांचा उद्रेक झाला. या घटनेला ठाण्याचे कवी प्रा. आदित्य दवणे यांनी सकारात्मक पद्धतीने उत्तर दिले आहे. समग्र शिवचरित्राचा प्रचार आणि प्रसार अमराठी जनांपर्यंत, महाराष्ट्राचा जाज्वल्य इतिहास युट्युबच्या माध्यमातून पोहोचावा, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हिंदी भाषेतून ते कथन करणार आहेत.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या ''राजा शिवछत्रपती'' या पुस्तकाचा आधार घेऊन दर रविवारी प्रदर्शित होणाऱ्या एक-एक भागाची निर्मिती आदित्य आणि टीमकडून होते आहे. उदाहरणादाखल ''शिवाजन्म'' हा पहिला एपिसोड राजा शिवछत्रपतींची ९९ पाने संक्षिप्त करून १००० शब्दात हिंदीत लिहून पूर्ण झाला. आदित्य यांची मातृभाषा मराठी असल्यामुळे हिंदी लिखाणात येणाऱ्या मर्यादा लक्षात घेऊन वझे केळकर महाविद्यालयातील हिंदी विषयाचे प्राध्यापक भरत कृष्णा भेरे यांनी हिंदी भाषेचे संस्कार प्रत्येक भागावर करून कंटेंटची गुणवत्ता अधिकाधिक सकस करण्याचा प्रयत्न केला आहे. इतिहासविषयक मार्गदर्शन आणि एपिसोडमधील ॲनिमेशन इतिहास अभ्यासक कौस्तुभ कस्तुरे यांनी, तर संकलन सहाय्य आदित्य यांचे विद्यार्थी स्वरांग गायकर याने केले आहे. या प्रकल्पाबद्दल मनोगत व्यक्त करताना दवणे म्हणाले, ‘आजच्या तारखेपर्यंत या प्रोजेक्टमधला प्रत्येक साथीदार हे शिवकार्य स्वतःची जबाबदारी मानून सहयोग देत आहेत. या प्रकल्पामुळे मला नवीन संकल्पना, हिंदी लेखन तसेच सादरीकरण, संकलन या सगळ्या गोष्टींचा नव्याने शोध लागला. या उपक्रमाने स्वसमाधान बरेच दिले. परंतु, महाराजांचा वैभवशाली इतिहास जास्तीत जास्त मराठी - अमराठी नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा वसा आज प्रत्येक शिवभक्ताने घ्यायला हवा. अंधभक्ती सोडून शिवचरित्रातून प्रेरणा घेऊन त्याचा अधिकाधिक प्रचार - प्रसार करण्याचे आवाहन यानिमित्ताने त्यांनी समस्त नागरिकांना केले आहे.