ठाणे: मराठी उद्योजकांनी आणि व्यावसायिकांनी एकत्र येऊन व्यवसाय वाढवा या दृष्टिकोनातून सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट ठाणे रीजनच्यावतीने येत्या १२ जुलै रोजी सकाळी ८ ते दुपारी १ वाजेपर्यंत डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे मराठी उद्योजकता दिवसाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती आज पत्रकार परिषदेत देण्यात आली. सॅटर्डे क्लबचे संस्थापक दिवंगत माधवराव भिडे यांच्या प्रेरणेने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमांमध्ये अनेक मान्यवर उद्योजक आणि व्यावसायिक उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. यानिमित्ताने आयोजित उद्योजकीय परिसंवादामध्ये पितांबरी उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक रविंद्र प्रभूदेसाई, उद्योजक मंदार भारदे, उद्योजक अशोक चव्हाण हे सहभागी होणार आहेत. तरुण उद्योजक अर्जुन देशपांडे यांच्यासह भिडे कट्टा यावर मुलाखत रंगणार आहे. त्यानंतर अनेक व्यवसायिकांना प्रशिक्षित करणारे विनीत बनसोडे यांच्या मोटिवेशनल ट्रेनिंगचे आयोजन करण्यात आले आहे.
सॅटर्डे क्लबचे कार्यकारी विश्वस्त अशोक दुगाडे, सेक्रेटरी जनरल सुहास फडणीस,विश्वस्त रविंद्र प्रभुदेसाई, विजय केळकर, अजित मराठे, प्रदीप ताम्हाणे, डेप्युटी सेक्रेटरी जनरल डॉ. प्रज्ञा बापट हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. उद्योजक आणि व्यावसायिकांसाठी हा कार्यक्रम विनामूल्य आहे.