जितेंद्र कालेकरलोकमत न्यूज नेटवर्कठाणे : मुंबईच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) मुंब्रा पोलिसांकडून मनसुख हिरेन यांचा मृतदेह मिळाला, त्या ५ मार्च रोजीच्या स्टेशन डायरीतील नोंदी ताब्यात घेतल्या. अन्य एका पथकाने एटीएसच्या ठाणे कार्यालयात मनसुख यांची पत्नी विमला आणि मोठा मुलगा मित यांची बुधवारी सुमारे पाच तास चौकशी केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
विधिमंडळामध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला धारेवर धरले असताना एटीएसच्या वेगवेगळ्या पथकांनी तपास गतीने सुरू केला. पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांच्या अधिपत्याखाली एका पथकाने मुंब्रा पोलीस ठाण्यात जाऊन या प्रकरणाशी संबंधित काही कागदपत्रे ताब्यात घेतली. यामध्ये हिरेन यांचा मृतदेह सापडला, त्या ५ मार्चच्या स्टेशन डायरीतील नोंदी तपासल्या. घटनास्थळाचा पंचनामा, पंच यांची माहितीही घेतली. त्यादिवशी एक मृतदेह खाडीकिनारी दिसत असल्याचे रेल्वे ब्रिज येथे काम करणाऱ्या वाघमारे नामक व्यक्तीने सकाळी १० वाजण्याच्या सुमारास मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाकडे माहिती दिली होती. तीच माहिती मुंबई नियंत्रण कक्षातून ठाणे शहर पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाली होती. ठाणे नियंत्रण कक्षातून मुंब्रा पोलिसांकडे माहिती आल्यानंतर त्याठिकाणी मुंब्रा पोलीस आणि ठाणे महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी पोहचले होते.क्रेनच्या मदतीने मृतदेह शुक्रवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मुंब्रा बायपास खाडीजवळील चिखलातून बाहेर काढण्यात आला. दरम्यान, नौपाडा पोलीस ठाण्यात दुपारी १२ ते १ वाजण्याच्या दरम्यान हिरेन यांचा मुलगा मित याने वडील बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविली. एक अनोळखी मृतदेह मुंब्रा खाडी परिसरात आढळला असून तो ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात ठेवल्याची माहिती हिरेन कुटुंबीयांना मिळाली. तेव्हा मनसुख हिरेन यांच्या भावाने रुग्णालयात जाऊन दुपारी ४.३० वाजता खात्री केल्यानंतर मृतदेह मनसुख यांचाच असल्याची ओळख पटली. त्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. तो अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे शुक्रवारी रात्री शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालाचे मत डॉक्टरांनी राखीव ठेवले आहे, असा सर्व घटनाक्रम मुंब्रा पोलिसांकडून एटीएसच्या अधिकाऱ्यांनी जाणून घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दोन खासगी बँकांमध्येही चौकशीnहिरेन कुटुंबीयांनी केलेल्या आरोपानुसार खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर मनसुख यांनी कोणाशी बँक व्यवहार केले आहेत का? सचिन वाझे यांच्याशी त्यांचे कोणत्या प्रकारे आर्थिक संबंध आले का? अशा सर्वच बाजूंनी एटीएसच्या अन्य एका पथकाने तपासणी केली. त्यासाठी ठाण्यातील दोन खासगी बँकांमध्येही या पथकाने चौकशी केली. nबुधवारी दुपारी १.३० ते सायंकाळी ६.३० अशी तब्बल पाच तास विमला हिरेन आणि मुलगा मित यांची ठाण्याच्या एटीएस कार्यालयात चौकशी झाली. या चौकशीतील तपशील मात्र समजू शकला नाही.