भिवंडी : भिवंडी परिसरातून प्लॅस्टिक पिशव्यांचा पुरवठा मोठ्या प्रमाणात होत असल्याची माहिती पर्यावरणमंत्री रामदास कदम यांना मिळाल्यानंतर त्यांनी गुरुवारी तालुक्यातील सोनाळे औद्योगिक वसाहतीमधील १५ हून अधिक प्लॅस्टिक पिशव्यांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांवर छापा टाकून कारवाई केली.कदम यांनी प्रदूषण नियंत्रण महामंडळातील अधिकाऱ्यांसह आमदार रूपेश म्हात्रे यांच्यासोबत आपला ताफा सोनाळे ग्रामपंचायत हद्दीतील गुरुदेव कम्पाउंडमध्ये वळवला असता, या ठिकाणच्या असंख्य प्लॅस्टिक कंपन्यांना बाहेरून टाळे असल्याचे निदर्शनास आले. कारखान्याच्या आतमध्ये नक्की काय सुरू आहे, याची माहिती मिळत नसल्याने या कंपन्यांच्या शटरचे टाळे तोडून या सर्वांनी कंपन्यांमध्ये प्रवेश केला. त्या वेळी तेथील प्लॅस्टिक पिशवी उत्पादन व कच्च्या मालाचा साठा आढळला. येथे कंपनीमालक सकाळच्या वेळी कामावर येणाºया कामगारांना सोबत जेवणाचा डबा घेऊन येण्यास सांगत होते. कामगार एकदा कंपनीमध्ये आल्यानंतर त्यांना सायंकाळी ६ वाजता सोडले जात होते. त्यामुळे बाहेरून टाळे लागलेल्या कंपन्यांमध्ये २५ तास प्लॅस्टिक पिशव्या उत्पादन सर्रासपणे सुरू असल्याचे उघड झाले आहे. या वेळी रामदास कदम यांनी तहसीलदार शशिकांत गायकवाड व तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे तसेच ग्रामपंचायत कर्मचाºयांना घटनास्थळी बोलावून या सर्व कंपन्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले.या पिशव्यांवर गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश येथील उत्पादन कंपन्यांची नावे प्रिंट केल्याचे आढळले. मात्र, या पिशव्यांचे उत्पादन भिवंडी येथे सुरू असल्याची माहिती मिळाल्याने धक्का बसला आहे. या ठिकाणी हजारो टन प्लॅस्टिकच्या पिशव्या तसेच हजारो टन कच्चा माल, यंत्रसामग्री जप्त केली असून येथील प्लॅस्टिक कंपन्यांच्या मालकांवर गुन्हे दाखल केले जाणार असल्याची माहिती रामदास कदम यांनी दिली.
भिवंडीत प्लॅस्टिक उत्पादक कंपन्यांवर पर्यावरणमंत्र्यांचा छापा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2019 6:04 AM