- वसंत पानसरेकिन्हवली - शहापूर तालुक्यात सध्या अॅन्युइटी हायब्रीड प्रकल्पांतर्गत रस्ता रुंदीकरण आणि नवीन रस्ता बनवण्याचे काम सुरू आहे. मात्र, या रस्त्यांच्या कामात झालेल्या वृक्षतोडीत पक्ष्यांची घरटी नष्ट होत असल्याने पक्षिप्रेमी नाराजी व्यक्त करत आहेत. त्यामुळे याबाबत वन्यजीव विभाग किंवा पक्षितज्ज्ञांच्या माध्यमातून गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता असल्याचे बोलले जात आहे.तालुक्यात सध्या शहापूर ते लेनाडमार्गे मुरबाड पुढे खोपोली, तर शहापूर ते डोळखांब व पुढे किन्हवली प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरण, लहानमोठे व पूल आणि नवीन रस्ता बनवण्याचे काम सुरू आहे. या रस्त्यांच्या कामात हजारोंच्या संख्येने विविध झाडे तोडण्यात आली. या झाडांची बेसुमार तोड होत असतानाच पावसाळ्यापूर्वी निरनिराळ्या पक्ष्यांनी बांधलेली घरटी उद्ध्वस्त होत आहेत. परिणामी, घरट्यातील निष्पाप पिलांना घरट्यातून बेदखल करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप पक्षिप्रेमी सोशल मीडियावर करत आहेत.त्यातच, पावसाळा सुरू झाल्याने पिलांसाठी घरटे बनवणे अशक्य आहे. परंतु, हे असेच सुरू राहिल्यास पक्ष्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होण्याच्या मार्गावर येईल. या रस्त्यांच्या विकासात पक्ष्यांच्या नवजात पिलांचा किंवा पक्ष्यांची अंडी यांचा बळी जात असल्याचा आरोप केला जात आहे. सध्या सोशल मीडियावर रस्त्याच्या कडेला असलेल्या वृक्षतोडीमुळे एका कावळ्याच्या पाडलेल्या घरट्याच्या प्रकारामुळे हा विषय ऐरणीवर आला आहे. त्यामुळे वन्यजीव विभाग आणि पक्षितज्ज्ञांनी लक्ष घालावे, अशी मागणी पक्षी आणि निसर्गप्रेमींकडून केली जात आहे.वृक्षतोड झाल्याने फांद्यांवरील घरट्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पक्ष्यांना राहण्यासाठी कृत्रिम घरट्यांची सोय करणे गरजेचे आहे. - सुनील वेखंडे, सचिव, सह्याद्री वनसंवर्धन संस्था.
वृक्षतोडीत पक्ष्यांची घरटी होताहेत नष्ट, पक्षितज्ज्ञांमध्ये नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2019 1:08 AM