ठाणे: पर्यावरण दक्षता मंडळातर्फे रविवारी बारा बंगला, ठाणे (पू.) येथे झाडांची ओळख या विषयावर निसर्ग भ्रमंती आयोजित केली होती. यावेळी ठाणेकरांना मंडळाच्या खजिनदार डॉ. मानसी जोशी यांनी झाडांची ओळख करुन दिली.पर्यावरण दक्षता मंडळातर्फे पर्यावरणाशी संबंधीत विविध उपक्रम राबविले जातात. त्यात निसर्ग भ्रमंती हा उपक्रम नियमीत सुरू आहे. आज देखील ही भ्रमंती ठाणे पुर्व येथील निसर्गरम्य असलेल्या बारा बंगला या ठिकाणी पार पडली. हा परिसर हिरवळीचा असून येथे स्थानिक आणि विदेशी झाडे देखील आहे. आपल्या परिसरातील झाडे आपल्याला माहित नसतात या झाडांची ओळख आपल्याला व्हावी या उद्देशाने पर्यावरण दक्षता मंडळातर्फे ही भ्रमंती आयोजित केली होती. यात २० वृक्षप्रेमींनी भाग घेतला होता. डॉ. मानसी जोशी यांनी वृक्षांचे महत्त्व पटवून देत झाडे कशी ओळखावी याची विस्तृत माहिती वृक्षप्रेमींना दिली. मुख्यत: झाडांवरील फुले किंवा फळे यांवरुन झाडे ओळखली जातात. पण बाराही महिने त्या झाडाला फळे, फुले नसतात. मग इतर वेळीही ती झाडे आपल्याला ओळखता यावी यासाठी त्यांचे वैशिष्ट्य माहिती असणे गरजेचे आहे. ही वैशिष्ट्ये त्यांनी उदाहरणासह त्यांना सांगितली. वृक्षप्रेमींनीही जोशी यांच्याकडून आपल्या शंकांचे निरसन करुन घेतले. बारा बंगला येथे वृक्षरोपणाचे नियोजन अतिशय चांगले आहे. अशा पद्धतीने वृक्षारोपण सगळीकडे व्हावे, जेणेकरुन रस्त्याच्या दुतर्फा झाडे पाहायला मिळतील अशी इच्छा डॉ. मानसी जोशी यांनी झाडांची ओळख करुन देताना व्यक्त केली. यावेळी बारा बंगल्यातील जवळपास २० झाडांची ओळख वृक्षप्रेमींना झाली.