लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : गेली अनेक वर्षे पूजा केलेल्या मूर्ती, तसबिरी आपल्या घरात असतात. एका विशिष्ट काळानंतर किंवा अन्य काही कारणांनी या देवीदेवतांची नित्य पूजाअर्चा करणे अनेकांना शक्य होत नाही. कधी-कधी या मूर्ती वा तसबिरी झिजतात, भंग पावतात. अशा मूर्तींचे, तसबिरींचे संकलन करून त्यावर पुनर्प्रक्रिया केली जाणार आहे. हा पर्यावरणपूरक उपक्रम संपूर्णम आणि झेप प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने हाती घेतला आहे.
हिंदू धर्म संस्कृतीतील अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या या देवदेवतांची मूर्ती, तसबिरी इतरत्र टाकलेल्या अवस्थेत पाहून वाईट वाटते; पण काय करावे हे सुचतही नसते. यातील काही खराब झालेल्या तसबिरी झाडाखाली, नदीनाल्यावर , मंदिराबाहेर ठेवलेल्या आपल्याला दिसतात. आम्ही अशा स्वरूपाच्या मूर्ती, तसबिरी जमा करून यावर जाणकार व्यक्तींकडून विधिवत उत्तरपूजा करून आधुनिक पद्धतीने याचे विघटन करणार आहोत. यातील देवदेवतांच्या मूर्ती वितळविल्या जातात आणि त्यांचा पुन्हा वापर केला जातो, असे झेप प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विकास धनवडे आणि संपूर्णमच्या संस्थापिका ॲड. तृप्ती गायकवाड यांनी सांगितले. अशा स्वरूपाच्या मूर्ती अथवा तसबिरी ज्यांच्याकडे आहेत त्या संकलित केल्या जाणार आहेत. रविवार २९ ॲागस्ट रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत झेप प्रतिष्ठान, जॉन्सन टाइल्सच्या वर, टायटन हॉस्पिटलसमोर, मानपाडा सर्व्हिस रोड, मानपाडा, घोडबंदर रोड, ठाणे (प.) येथे जमा करण्याचे आवाहन संस्थांनी केले आहे.
या वस्तूंचे एकत्रीकरण करून पुढील प्रक्रियांसाठी जो काही खर्च येतो तो ऐच्छिक स्वरूपात देणगी म्हणून देऊ शकता, असे आवाहन त्यांनी केले आहे. या उपक्रमात सर्व प्रकारच्या देवांच्या मूर्ती, प्रतिमा, टाक, पितळ, प्लास्टिक, लाकूड, पोथ्या, ग्रंथ, जुन्या लोकांचे फोटो स्वीकारले जातील. आपल्याकडील प्रतिमा एका खोक्यात किंवा गोणीत आणून देताना त्यावर आपले पूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक लिहावा, असे आवाहन करण्यात आले आहे.