मुंबई : ममता कुलकर्णी व तिचा पती विकी गोस्वामी आरोपी असलेल्या ईफेड्रिन ड्रग प्रकरणी आरोपी मनोज जैन याच्या जामिनासाठी त्याच्या नातेवाइकांनी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे घर गाठून त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला.न्या. रेवती डेरे-मोहिते यांनी मंगळवारी न्यायालयाचे कामकाज सुरू असताना विशेष सरकारी वकिलांना ही बाब सांगितली. त्याबाबत नाराजी व्यक्त करत, जामीन अर्जावरील सुनावणी आपण घेऊ शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.अॅव्हॉन लाइफ सायन्स या कंपनीवर पोलिसांनी छापा टाकून सुमारे अडीच हजार कोटी रुपयांचे ईफेड्रिन जप्त केले. कंपनीचा मालक मनोज जैन, व्यवस्थापक राजेंद्र डिमरी व युनियन लीडर बाबा धोत्रे यांना अटक केली. ठाणे विशेष एनडीपीएस न्यायालयाने या सर्वांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात जामीन अर्ज केला. न्या. रेवती मोहिते-डेरे यांच्यासमोर या जामीन अर्जावर सुनावणी होती. न्यायाधीशांनी या प्रकरणात अॅड. अयाज खान आरोपींच्या बाजूने लढणार आहेत का, असा प्रश्न केला. त्यावर अॅड. हिरये यांनी ‘हो’ म्हटल्यावर, न्यायाधीशांनी आपण प्रकरणावर सुनावणी घेऊ शकत नाही, असे सांगितले.आरोपींचे नातेवाईक माझ्या घरी आले. त्यांनी माझ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. आरोपींचे नातेवाईक आणि मी एकाच परिसरात राहतो, असे न्या. रेवती मोहिते-डेरे यांनी सांगितले. संबंधित प्रकारामुळे अर्जावर सुनावणी घेऊ शकत नाही, असे न्यायाधीशांनी स्पष्ट केले.न्या. रेवती डेरे-मोहिते यांनी भर कोर्टात असे सांगून, नागरिकांचा न्यायसंस्थेवरील विश्वास अधिक दृढ केला आहे, असे विशेष सरकारी वकील हिरये यांनी सांगितले.ममता कुलकर्णी व तिचा पती विकी गोस्वामी यांच्यावर भारताबाहेरून देशात ड्रग विकत असल्याचा आरोप आहे. विकी गोस्वामीने ईफेड्रिन हे अॅव्हॉन लाइफ सायन्स कंपनीकडे देत त्यानंतर त्याची विक्री केल्याचा तपासयंत्रणेचा दावा आहे.
ईफेड्रिन प्रकरण : आरोपींच्या नातेवाइकांचा न्यायाधीशांवर दबाव, न्यायाधीशांचा सुनावणीस नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 5:25 AM