कल्याण : कल्याण-मुरबाड मार्गावरील शहाड रेल्वे उड्डाणपुलाच्या आधी वालधुनी नदीवर असलेला जुना पूल तोडण्याचे नियोजन कल्याण-डोंबिवली महापालिकेने केले आहे. परंतु, वाहतूककोंडी विचारात घेऊन आधी महापालिकेने आम्हाला आवश्यक ती साधनसामग्री द्यावी, मगच पूल पाडण्याचे काम हाती घ्यावे, अशी मागणी वाहतूक पोलीस शाखेने केडीएमसी आयुक्त गोविंद बोडके यांच्याकडे केली आहे.
कल्याणमध्ये वाहतूककोंडीची समस्या आहे. कल्याण-शीळ मार्गावरील जुना पत्रीपूल पाडण्याचे काम २५ सप्टेंबरपासून सुरू झाले आहे. त्यामुळे जुन्या पत्रीपुलाशेजारील पुलावरून वाहतूक सुरू आहे. परिणामी, तेथे कोंडी होत आहे.
त्याचबरोबर शहरातील कल्याण-उल्हासनगर मार्गावरील वालधुनी रेल्वे उड्डाणपूल, कल्याण-मुरबाड रोडवरील शहाड उड्डाणपुलावरही कोंडी होते. अशा परिस्थितीत कल्याण-मुरबाड रोडवरील जुन्या वालधुनी पुलाचे पाडकाम महापालिका हाती घेणार आहे. त्याबाबत, महापालिकेने वाहतूक शाखेला कळवले आहे. वाहतूक शाखेने त्यांना नाहरकत दिली असल्याचे सांगण्यात येत आहे.
जुन्या पुलाला समांतर नवा पूल एका बाजूने खुला करण्यात आला आहे. जुना पूलही नव्याने बांधण्याचे नियोजन आहे. पूल पाडण्याचे काम सुरू करण्यापूर्वी महापालिकेने वाहतूक शाखेला २० ट्रॅफिक वॉर्डन, ५० लोखंडी बॅरिकेड्स, रिफ्लेक्टर, १० जॅमर पुरवावेत. त्यानंतरच पूल पाडण्याचे काम सुरू करावे, असे पत्रच आयुक्तांना देण्यात आले आहे.
नियोजन करूनच हा पूल पाडावा लागेल. जर नियोजन न करताच पाडला तर कल्याण शहरातील कोंडीत अधिकच भर पडेल. तसेच मुरबाड, नगरकडे जाणाऱ्या मार्गावरही ताण येऊ शकेल.वाहतूककोंडी तीव्र होणारकल्याण-शीळ रोडवरील जुना पत्रीपूल पाडण्याचे काम सुरू असताना शहराच्या एण्ट्री पॉइंटला असलेल्या दुसºया ठिकाणी कल्याण-मुरबाड रोडवरील वालधुनी नदीवरील जुना पूल पाडण्याचे काम एकाच वेळी हाती घेतल्यास शहरात कोंडी अधिक तीव्र होऊ शकते, अशी शक्यता वाहतूक पोलिसांनी व्यक्त केली आहे.