ठाणे- मागील काही दिवसांपासून ठाण्यातील पोखरण रोड नं. २, भीम नगर आणि आजूबाजूच्या गृहसंकुलात बिबट्याचे दर्शन झाले होते. त्यानंतर येथील गृहसंकुलांमध्ये नागरीकांच्या मनातील भिती घालविण्यासाठी आणि त्यांना बिबट्यपासून कसे रक्षण करता येईल, यासाठी जनजागृतीदेखील केली आहे. यापुढे जाऊन वनविभागाने या बिबट्याच्या हालचाली टिपण्यासाठी या भागात तब्बल ९ ट्रॅप कॅमेरे लावले असून त्या माध्यमातून तो कुठून आला, कुठे गेला याची माहिती घेतली जाणार आहे.
उपवन आणि आजूबाजूच्या परिसरात मागील काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढतांना दिसत आहे. यामुळे येथील गृहसंकुलांमध्ये वनविभाग आणि वाईल्ड लाईफ असोसिएशनच्या वतीने जनजागृती करण्यात आली आहे. त्यानुसार तो बिबट्या लाजाळू आहे, तो मनुष्याला धोका उद्भवू शकत नाही, त्याला पुन्हा संजीव गांधी जंगलात परतायचे आहे, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन वाईल्ड लाईफ असोसिएशनचे पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
ठाणे शहरात असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या लगत परिसरात बिबट्याचा वावर सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून सद्या हा बिबट्या कुठे आहे? तो जंगलात गेला आहे, की नाही याचा शोध वनविभागाने सुरू केला आहे. या बिबट्याचा शोध घेण्यासाठी ९ हून अधिक ट्रॅप केमेरे लावण्यात आले आहेत. बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत आहे. राष्ट्रीय उद्यानाच्या डोंगरापासून ते शहरी भागात बिबट्याचा वावर पाहायला मिळाला असल्याने बिबट्याच्या मार्गावर हे ट्रॅप कॅमेरे बसवण्यात आले असून बिबट्या कुठे आहे, याचा शोध आता घेण्यात येत आहे.
बिबट्या मानवी वस्तीत आल्यानंतर याचा त्रास कोणाला होऊ नये म्हणून अधिक सतर्कता बाळगली पाहिजे हाच उद्देश असल्याचे मानद वन्यजीव रक्षक रोहित मोहिते यांनी सांगितले.