मीरा रोड : मीरा-भार्इंदर महापालिकेच्या बांधकाम विभागाने उद्यान विभागाला न विचारताच झाडांभोवती कोट्यवधी खर्चून संरक्षक कठड्यांची कामे चालवली आहेत. परंतु, ही कामे निकृष्ट दर्जाची असून आतील डांबर-काँक्रिट न काढताच त्यावर माती टाकली जात असल्याचा गैरप्रकार उघड झाला आहे. यामुळे झाडांच्या नैसर्गिक वाढीवर आणि मजबुतीकरणावर परिणाम होत आहे.
महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केल्या जाणाऱ्या रस्ते, गटारे व पॅचवर्कच्या कामावेळी झाडांचेच डांबरीकरण व काँक्रिटीकरण केले जात आहे. झाडांच्या सभोवतालची जागा ही मोकळी ठेवणे आवश्यक असते. परंतु, डांबरीकरण, काँक्रिटीकरणाने झाडांना मिळणारी हवा, पाणी व पोषकतत्त्व यांच्यावर परिणाम होतो. काही ठिकाणी तर डेब्रिज टाकले जाते.
वृक्ष प्राधिकरणाने बांधकाम विभागास झाडांभोवती काँक्रिटीकरण करू नये तसेच कंत्राटदारांना तशा सूचना द्याव्यात, असे कळवले होते. याप्रकरणी प्राधिकरणाने कंत्राटदारांवर गुन्हा दाखल करण्याचा प्रस्ताव तयार केला. तसेच बांधकाम विभागाच्या कनिष्ठ अभियंत्यास समज देण्याचेही म्हटले. परंतु, पालिका प्रशासन, बांधकाम विभाग कंत्राटदारास पाठीशी घालत आहे.
गंभीर बाब म्हणजे संरक्षक कठडा बांधताना झाडाभोवतीचे डांबर, काँक्रिट काढलेले नाही. ते न काढताच उलट त्यावर माती टाक ल्याने झाडांची मुळे जमिनीत खोल जाऊच शकत नाहीत, हे उघड झाले आहे. झाडांभोवती हा एकप्रकार फासच आवळला जात आहे.झाडांभोवती कठड्यांसंदर्भातील काम करताना आमच्या विभागाला विचारलेले नाही. डेब्रिज काढून मगच माती टाकली पाहिजे होती. सभोवताली १ बाय १ मीटरचे क्षेत्र खुले ठेवणे आवश्यक आहे. याआधीही झाडांच्या बुंध्याशी कंत्राटदाराने डांबर, काँक्रिट, खडी टाकून झाडांच्या नैसर्गिक वाढीला धोका निर्माण करत असल्याचे वरिष्ठांना कळवले आहे. - हंसराज मेश्राम, अधिकारी, उद्यान विभाग