लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : कल्याण-डोंबिवली शहरातील वाहतूक आणि पार्किंगच्या समस्येवर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने एका सल्लागार कंपनीने तयार केलेल्या अहवालात असंख्य त्रुटी असल्याकडे शुक्रवारच्या केडीएमसीच्या महासभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी लक्ष वेधले. ढोबळ मानाने तयार केलेल्या अहवालासाठी संबंधित कंपनीला ३३ लाख ३६ हजार रुपये अदा केले जाणार आहेत, यावरही नगरसेवकांकडून चांगलेच तोंडसुख घेतले. अखेर या अहवालातील केवळ हॉकर्स आणि पार्किंग पॉलिसीचा विचार करून पुढील निर्णय घेतला जाईल, असा आदेश महापौर राजेंद्र देवळेकर यांनी प्रशासनाला दिला.वाहतुकीच्या समस्या व उपाययोजना सूचवण्यासाठी मे. आकार अभिनव कन्सलटन्ट या कंपनीला अहवाल तयार करण्याचे कंत्राट देण्यात आले होते. त्यांनी सूचवलेल्या अल्पकालीन, मध्यम व दीर्घकालीन वाहतूक व्यवस्थापन उपाययोजनांसाठी ११ हजार १२६ कोटी ७२ लाख रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. पुढील २० वर्षांसाठी या खर्चाचे नियोजन करण्याच्या दृष्टीने या प्रकल्प अहवालास मान्यता द्यावी, असा प्रस्ताव महासभेच्या पटलावर प्रशासनाने दाखल केला होता. हा प्रस्ताव चर्चेला येताच शिवसेनेचे नगरसेवक वामन म्हात्रे यांनी या अहवालावर टीका केली. ९ हजार हेक्टर जमीन शहरी विकासासाठी ठेवली होती, यातील ७० टक्के जागेवर बेकायदा बांधकामे उभी राहिली आहेत, मग उपाययोजना व विकासासाठी जागा शिल्लक आहे का? असा सवाल त्यांनी यावेळी केला. सल्लागाराच्या नियुक्तीसाठी केवळ स्थायी समितीची मंजुरी घेतली , या धोरणात्मक निर्णयासाठी महासभेची मान्यता घ्यायला हवी होती, याकडे भाजपाचे नगरसेवक राजन सामंत यांनी लक्ष वेधले. एकीकडे २ ते ४ लाखांच्या विकासकामांच्या फाइली मंजूर करताना प्रशासनाच्या दारी खेपा घालाव्या लागतात, मात्र अशा सल्लागार कंपनीवर तत्काळ ३३ लाखांचा खर्च केला जातो. बीएसयुपी योजनेच्या सल्लागारासाठी १६ कोटी फी मोजली, परंतु त्याचे फलित काय मिळाले?, असा सवाल भाजपाचे नगरसेवक राहुल दामले यांनी केला. या अहवालात असंख्य त्रुटी असून ढोबळ अंदाज दिले आहेत, याला विरोध असल्याचे मत शिवसेना नगरसेवक श्रेयस समेळ यांनी मांडले. दरम्यान, मनसेचे विरोधीपक्षनेते मंदार हळबे यांनी सध्या हॉकर्स आणि पार्किंग पॉलिसीची अंमलबजावणी करणे महत्त्वाचे आहे. संबंधित अहवालात त्याचाही उल्लेख आहे, त्यामुळे या बाबींचा विचार करून निर्णय घ्यावा, अशी सूचना मांडली. ही सूचना महापौर राजेंद्र देवळेकर व सर्वपक्षांच्या सदस्यांनी एकमताने मान्य केली.सामंत-शेट्टी यांच्यात खडाजंगी कल्याण पूर्वेकडील लोकग्राम बुकींग कार्यालय ते नेतीवली रस्त्यापर्यंत विकास आराखड्याप्रमाणे रस्ता तयार करण्याच्या कामात स्थळ बदली करण्यास मान्यता देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने दाखल केला होता. मात्र, या रस्त्याचे काम पाच वर्षांपूर्वी झाले असताना इतक्या उशिरा प्रस्ताव महासभेत का आला?, असा सवाल विरोधीपक्षनेते हळबे यांनी प्रशासनाला केला. त्यावर भाजपाचे राजन सामंत यांनीही प्रस्ताव चुकीच्या पध्दतीने आल्याचे सांगत त्यास मंजुरी देण्यास नकार दिला. त्यावर शिवसेनेचे लोकग्राममधील स्थानिक नगरसेवक मल्लेश शेट्टी हे कमालीचे संतप्त झाले. नागरिकांच्या सोयीसाठी हा रस्ता तयार केला आहे. रेल्वे प्रशासनाने समांतर रस्त्यास मान्यता नाकारल्याने गृहसंकुलातून नागरिकांसाठी वहीवाट तयार केल्याचे शेट्टी यांनी सांगितले. प्रस्ताव मंजूर करण्यास हरकत काय?, असा सवाल करत नाहीतर रस्ता बंद करतो, अशी भाषा शेट्टी यांनी वापरली. त्याला सामंत यांनी हरकत घेत धमकीची भाषा बोलू नका, असे त्यांना सुनावले. यावर धमकीच देतोय असे समज, असे बोल शेट्टी यांनी सुनावले. त्यामुळे त्यांच्यात आणि सामंत यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. या वेळी महापौर देवळेकर आणि सभागृहनेते राजेश मोरे यांनी मध्यस्ती करत दोघांनाही शांत केले. प्रशासनाच्या चुकीमुळे नगरसेवकांमध्ये भांडण होत असल्याकडे हळबे यांनी लक्ष वेधले. यावेळी झालेल्या बहुचर्चेनंतर संबंधित प्रस्तावाला मान्यता देण्यात आली.
वाहतुकीच्या अहवालात त्रुटी
By admin | Published: July 08, 2017 5:28 AM