डोंबिवली : रेल्वेस्थानकाच्या पूर्वेला कल्याण दिशेकडील पादचारी पुलाच्या जिन्याचा आराखडा चुकल्याने प्रवाशांची त्यावरून ये-जा करताना प्रचंड दामछाक होत होती. याबाबत प्रवाशांच्या तक्रारी येताच या पुलाच्या दुसऱ्या बाजूस नवीन जिने बांधण्यात आले. त्यामुळे आता जुन्या पायऱ्या तोडण्यास सुरुवात झाल्याने हा खर्च वाया गेल्यात जमा आहे. मात्र, त्या जागी स्वयंचलित जिने बसविण्याची चाचपणी रेल्वे प्रशासनाने सुरू केली आहे.
डोंबिवली स्थानकातील कल्याण दिशेकडील जुना पादचारी पूल रुंद होता. तसेच तो धोकादायक झाल्याने पाडून नवीन बांधण्यात आला. लॉकडाऊनच्या काळात हा पूल खुला करण्यात आला. मात्र, या पुलाच्या पूर्वेच्या दिशेला असलेल्या जिन्याचा चढ उंच होता. त्यामुळे नागरिकांना प्रचंड दम लागत असे. तसेच जिना उतरतानाही त्यांनी भीती वाटत असे. नवीन पुलाच्या जिन्याचा आराखडा चुकल्याने नागरिकांनी चांगलीच टीका केली. अखेरीस रेल्वे प्रशासनाने या जिन्याशेजारी दुसऱ्या बाजूस उतरणारा नवीन जिना बांधला आहे. तर, चुकीचा जिना पाडण्यास सुरुवात केली आहे.
रेल्वेच्या उपअभियंत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघात होण्याची शक्यता असल्याने तो धोकादायक जिने तोडण्यात येत आहेत. तेथे एस्क्लेटर बनवण्याच्या दृष्टीने फिजिबिलिटी (व्यवहार्यता) अहवाल बनवायचा मानस आहे. सध्या बांधलेल्या नवीन जिन्याच्या जागेवर रेल्वेचे तिकीटघर बांधण्याचे नियोजन होते, आता ते शक्य होणार नाही. परंतु, जिथे आताचा जुना जिना आहे तिथे प्रवाशांच्या सुविधेसाठी निर्णय घेण्यात येणार आहे. नव्याने जिना बांधणे, जुना तोडणे या तांत्रिक विषयामुळे कंत्राटदाराचा किंवा रेल्वेचा निधी खर्च झाला असला तरीही प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
--------------