ठाणे: राबोडी भागात नाल्याला पूर आल्यामुळे मोठया प्रमाणात पाणी साचून रहिवाशी अडकल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागासह ठाण्यातील अग्निशमन दल तसेच पोलिस यंत्रणेलाही मिळाली. ही माहिती मिळताच तातडीने या सर्व यंत्रणांनी संबंधित ठिकाणी धाव या रहिवाशांची सुटका केली. पावसाळयात जर अशी आपत्ती ओढवलीच तर यंत्रणा किती सतर्क आहेत, याची चाचपणी करण्यासाठी हे मॉकड्रील ठाणे महापालिकेने सोमवारी दुपारी राबविल्याचे नंतर स्पष्ट झाले.
राबोडीतील आनंद पार्क येथील आशियाना बंगल्यसमोरील नाला टूथडी भरुन वाहत असल्याची माहिती ८ मे रोजी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन कक्षामध्ये राबोडी पोलिसांनी दिली. जवळच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे रहिवाशी अडकल्याचेही सांगण्यात आले. त्यानुसार घटनास्थळी राबोडी पोलीस, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान, अग्निशमन दलाचे जवान हे रेस्क्यु वाहनासह तसेच राष्ट्रीय महामार्ग कर्मचारी, महावितरणचे कर्मचारी आणि ठाणे नगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी,१०८-रुग्णवाहिका त्याचबरोबर ठाणे महापालिकेच्या उथळसर प्रभाग समितीचे कर्मचारी आणि कॉज फाउंडेशनचे (महिला व बालसुरक्षा संस्था) कर्मचारी घटनास्थळी अवघ्या काही वेळातच दाखल झाले.
त्यानंतर अशीच एखादी आपत्ती ओढवली तर यंत्रणा किती सतर्क आहेत, याची चाचपणी करण्यासाठी हे मॉकड्रील घेतल्याचे यावेळी राबोडी पोलिसांनी सांगितले. यात सर्व यंत्रणा यशस्वी झाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घाटेकर यांनी दिली. खिडकाळीमध्येही आपत्ती विभागाची परीक्षा!दरम्यान, अशाच प्रकारचे मॉकड्रील सोमवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास डायघर पोलिसांनी रिव्हर वूड पार्क, देसाई नाका, कल्याण - शिळफाटा रोड, खिडकाळी या भागात घेतले. ठाणे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचल्याने इमारत क्रमांक ३५ मध्ये काही व्यक्ती अडकल्याची माहिती देण्यात आली होती. याठिकाणीही अग्निशमन दल, डायघर पोलीस, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान, दिवा प्रभाग समितीचे पथक, टोरंट पॉवर कंपनीचे कर्मचारी आदींनी धाव घेत हे मॉक ड्रीलही सायंकाळी ६.४० वाजण्याच्या सुमारास यशस्वी केले.