नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाच्या योजना या परतफेडीच्या कर्जयोजना असून त्याचा लाभ अत्यंत मर्यादित आहे. त्यामुळे अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थांच्या शैक्षणिक,सामाजिक व आर्थिक सक्षमीकरणासाठी बार्टी, महाज्योती,अमृत या संस्थाच्या धर्तीवर भारतरत्न डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम संशोधन,प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था स्थापन करावी अशी मागणी भिवंडीचे समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
अल्पसंख्यांक समाजतील विद्यार्थी व युवक - युवतींच्या उन्नतीसाठी १९५६ मध्ये ‘मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ’ स्थापन केले.मंडळाच्यावतीने डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम शैक्षणिक कर्ज योजना आणि उद्योग-व्यवसायासाठी मुदत कर्ज योजना राबवल्या जातात.मंडळाची ३० कोटी शासन हमी ९ जानेवारी२०२४ रोजीच्या शासन निर्णयाव्दारे ५०० कोटी केली आहे.मात्र मंडळाच्या योजना कर्ज योजना म्हणून कायम आहेत.त्यामध्ये जामीनदार शासकीय नोकरदार असावा लागतो किंवा स्थावर मालमत्ता तारण ठेवावी लागते.या अटींची पूर्तता करणे अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांना अशक्य आहे.त्यामुळे कर्ज योजनांचा लाभ घेण्यापासून अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थी वंचित राहात आहेत,असे आमदार शेख यांनी निवेदनात म्हटले आहे.
सारथी,बार्टी,महाज्योती या संस्था त्या,त्या समाजघटकातील विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणासाठी तसेच स्पर्धा परीक्षांसाठी शिष्यवृत्ती, ट्रेनिंग आदी उपक्रम राबवतात.पीएच.डी.करणाऱ्या तसेच परदेशात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना थेट शिष्यवृत्ती देतात.या प्रकारचा लाभ अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांना कोणत्याही शासन योजनेतून मिळत नाही.अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि नोकरीमध्ये आरक्षण नाही.परिणामी, बहुतांशी विद्यार्थी शिक्षणापासून आणि पर्यायाने विकासापासून वंचित राहत आहेत.त्यामुळे अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांवर आणि युवक- युवतींवर अन्याय होत असल्याची भावना समाजात असल्याचे शेख यांनी म्हटले आहे.त्यामुळे सारथी,बार्टी,महाज्योती, आणि अमृत या स्वायत्त संस्थांप्रमाणे ‘भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था’ स्थापन करावी आणि अल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थ्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्याची संधी द्यावी, अशी मागणी आमदार रईस शेख यांनी केली आहे.