ठाणे: कोरोना व्हायरसचा प्रतिबंध करण्याच्या अनुषंगाने ठाणे महापालिकेने ठाणेकर नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन करतानाच या व्हायरसचा सामना करण्यासाठी ठाण्यामध्ये श्रीनगर येथे २५ खाटांच्या तसेच रोझा गार्डनिया येथे १५ खाटांच्या विलगीकरण कक्षाची सुविधा निर्माण केली आहे. कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातही आठ खाटांचा विलगीकरण कक्ष आणि खाजगी रु ग्णालयामध्ये १२ खाटांच्या विलगीकरण कक्षाची सुविधा निर्माण करण्यात आली आहे.
कोरोना व्हायरसबाबत व्यापक जनजागृती करण्यासाठी महापालिकेच्या वतीने मोठ्या प्रमाणात कार्यवाही करण्यात येत असून शुक्रवारी कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहामध्ये महापौर नरेश गणपत म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली आणि महापालिका आयुक्त (प्रभारी) राजेंद्र अहिवर यांच्या उपस्थितीत सर्व अधिकारी, वैद्यकीय अधिकाऱ्यांची बैठक संपन्न होऊन त्यामध्ये कोरोनाबाबत सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. महापालिकेच्या वतीने रॅपिड रिस्पॉन्स पथक स्थापन केले असून आपत्ती व्यवस्थापन कक्षात २४ तास एका डॉक्टरची नियुक्ती करण्यात आली आहे.
महापालिकेच्या पुढाकाराने ज्युपिटर हॉस्पिटल येथे २, काळसेकर हॉस्पिटल, मुंब्रा येथे २, वेदान्त रु ग्णालय येथे ५, कौशल्य हॉस्पिटल येथे २ आणि बेथनी रु ग्णालय येथे दोन खाटांची विलगीकरण सुविधा निर्माण करण्यात आली आहे. कोरोनाबाबत नागरिकांनी घाबरून न जाता जागरूक राहून त्याचा प्रतिबंध करण्यासाठी काळजी घ्यावी, असे आवाहन महापौर म्हस्के आणि महापालिका आयुक्त (प्रभारी) अहिवर यांनी केले आहे. कोरोना व्हायरसची भीती वेगाने पसरत आहे. या आजाराशी दोन हात करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज झाली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.पॉझिटिव्ह रुग्णाची प्रकृती स्थिरठाण्यात कोरोनाग्रस्त पॉझिटिव्ह सापडलेल्या रुग्णाची प्रकृती आता स्थिर आहे. तो फ्रान्सवरून घरी आल्याने त्याच्या कुटुंबीयांचीही चाचणी केली गेली आहे. यासंदर्भात आलेल्या अहवालात ते निगेटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे, अशी माहिती ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली.