ठाणे : कोरोनाचा प्रभाव झोपडपट्टीत अधिक वाढत असल्यामुळे यापुढे झोपडपट्टी पुनर्विकास योजनेंतर्गत (एसआरए) योजनेत प्रत्येक प्रकल्पात एक ते पाच हजार चौरस फुटांचे आरोग्य केंद्र उभारण्यात येईल, अशी घोषणा गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. याबाबतचे आदेश दिल्याची माहिती आव्हाड यांनी शुक्रवारी टिष्ट्वटरद्वारे दिली.
कोरोनाचा मागील दीड महिन्यात झोपडपट्टी भागात शिरकाव झाला आहे. मुंबईतील धारावी किंवा ठाण्यातील झोपडपट्टी भागात तसेच अन्य महापालिकांच्या क्षेत्रातील झोपडपट्टी भागात कोरोनाचा प्रभाव दिवसागणिक वाढत आहे. लागलीच उपचार मिळणे कठीण होत आहे. क्वारंन्टाइन करणे, रुग्णांच्या संपर्कातील लोकांचा शोध घेणे यासाठी तारेवरची कसरत सुरु आहे. विविध उपाय करुनही कोरोनाचा प्रभाव झोपडपट्टी भागातून कमी झालेला नाही. त्यामुळे यापुढे ज्या भागातील झोपडपट्टीचा विकास होईल त्या ठिकाणी एक ते पाच हजार चौरस फुटांचे आरोग्य केंद्र उभारण्यात येणार आहे, अशी माहिती आव्हाड यांनी दिली. ही आरोग्य केंद्रे ‘फ्री आॅफ एफएसआय’ तत्त्वावर बांधण्यात येणार आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.